थकीत ऊसबिले द्या; अन्यथा आंदोलन
भारतीय कृषक समाज संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे इशारा
बेळगाव : जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले आहे. गळीत हंगाम संपुष्टात आला तरी त्यांच्या थकीत ऊस बिलांची रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही. यामुळे त्यांना शेतीसह कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण होत आहे. यासाठी तात्काळ शेतकऱ्यांना व्याजासह थकीत ऊसबिल देण्यात यावे, अशी मागणी भारतीय कृषक समाज संघटनेच्यावतीने करण्यात आली. या संदर्भात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन देत आठवडाभराचा अल्टिमेटम देण्यात आला असून तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
मागील तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांनी साखर कारखान्यांना ऊसपुरवठा करूनही त्यांना देय असलेली रक्कम अद्याप मिळालेली नाही. साखर आयुक्तांच्या नियमांनुसार ऊस पुरवठ्यानंतर 14 दिवसांच्या आत शेतकऱ्यांना पैसे देणे बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक महिने उलटूनही व गळीत हंगाम संपला तरी कारखान्यांकडून देयके प्रलंबितच असल्याने शेतकरी आर्थिक संकटात अडकले आहेत. शेतकरी कर्ज काढून पिके घेतात. मात्र कारखानदारांकडून वेळेत बिले देण्यात येत नसल्याने त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
नियमानुसार व्याजासह रक्कम जमा करा
कर्ज काढून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. मुलांच्या शिक्षणापासून ते दैनंदिन खर्च भागवणेही कठीण झाले आहे. कारखानदार आणि संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये. केवळ मूळ थकबाकी नव्हे तर नियमानुसार व्याजासह संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. तसेच एका आठवड्याच्या आत सर्व देयके अदा न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी महांतेश कमत, देवल उडमठ, अशोक कळसण्णवर, शांतिनाथ मगदूम, गुळप्पा दिवटगी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.