For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कामगारांना किमान वेतन द्या

12:54 PM Jan 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
कामगारांना किमान वेतन द्या
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची उद्योजकांना सूचना

Advertisement

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील प्रमुख उद्योजकांशी मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत चर्चा केली. उद्योगांनी त्यांच्या कामगारांना किमान वेतन द्यावे, सरकारच्या अधिसूचनेप्रमाणे व त्या तारखेनुसार त्यांना वेतन मिळाले पाहिजे, असे डॉ. सावंत यांनी स्पष्टपणे सांगितले. त्याची कार्यवाही व्हावी म्हणून सरकार कार्यरत राहणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी औद्योगिक विकास महामंडळाच्या (आयडीसी) बोधचिन्हाचे डॉ. सावंत यांनी अनावरण केले. नवीन औद्योगिक धोरणावरही यावेळी चर्चा करण्यात आली. उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, आयडीसीचे अध्यक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांची उपस्थिती होती.

परप्रांतियांना प्राधान्य नको : कोचकर

Advertisement

गोवा उद्योग संघटनेचे अध्यक्ष दामोदर कोचकर हे यावेळी बोलताना म्हणाले की, उद्योगांमध्ये गोमंतकीय युवकांना प्राधान्य देण्याची गरज आहे. गोव्यातील युवक विविध कारणांसाठी सुट्टी घेतात परंतु गरजेच्या वेळी तेच युवक कामासाठी हजर राहतात. त्यामुळे परप्रांतीय युवकांना प्राधान्य नको, असे त्यांनी नमूद केले.

संपावर जात नाही, संघटना करत नाही

उद्योगांसाठी सरकारची मदत मिळत असून स्थानिकांना नोकऱ्या देणे ही उद्योजकांची जबाबदारी आहे. गोव्यातील फार्मा कंपनीत महाराष्ट्र व कर्नाटकातील युवकांना नोकरीत घेण्यात येत होते म्हणून गोमंतकीय युवकांना घेण्याचे प्रमाण कमी होते, परंतु परप्रांतीय युवक संप करतात व त्याचा विपरित परिणाम उद्योगावर होतो. म्हणून आता गोव्यातील उद्योगांतून स्थानिक युवकांना नोकरीची संधी देण्यात येत आहे. ते संपावर जात नाहीत व संघटना करीत नाहीत, असे कोचकर यांनी सांगितले.

उद्योजकांना स्थानिकांचे महत्त्व पटले

उद्योगांच्या फायद्यासाठी स्थानिक युवकांना नोकरी देणे महत्त्वाचे आहे, हे उद्योजकांनाही कळून चुकले आहे. संघटनेतर्फे स्थानिकांना नोकऱ्या देण्याची सूचना उद्योजकांना करण्यात आली आहे. स्थानिक उद्योजकांनी देखील वस्तुस्थिती समजून घेण्याची आवश्यकता आहे, असे कोचकर म्हणाले. नवीन उद्योग नियम व ऑनलाईन सेवांमुळे अनेक कामे सुकर झाली असून परवाने देखील सोपे झाल्याचा दावा कोचकर यांनी बोलताना केला.

Advertisement
Tags :

.