For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घरपट्टी भरा अन् सवलतींचा लाभ घ्या

10:49 AM Jun 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
घरपट्टी भरा अन् सवलतींचा लाभ घ्या
Advertisement

मनपा आयुक्त लोकेश यांचे नागरिकांना आवाहन : पूर नियंत्रणासाठी 5 पथकांची नेमणूक 

Advertisement

बेळगाव : राज्य सरकारने बेळगाव शहरातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे. जुलै 31 पर्यंत घरपट्टी भरणाऱ्या नागरिकांना पाच टक्क्यांची सवलत जाहीर केली आहे. त्याचा लाभ बेळगावच्या जनतेने घ्यावा आणि सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त पी. एन. लोकेश यांनी केले आहे. याचबरोबर पूर परिस्थिती नियंत्रणासाठी 5 पथके नेमण्यात आली असून हेल्पलाईनही सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. लोकसभा निवडणुकीमुळे महानगरपालिकेतील कर्मचारी त्या कामामध्ये गुंतले होते. त्याचा परिणाम घरपट्टी जमा करण्यामध्ये झाला होता. यातच काही समस्या निर्माण झाल्याने सवलतीमध्ये एक महिना वाढ द्यावी, अशी मागणी महापौर, उपमहापौर यांच्यासह आम्ही सरकारकडे केली होती. त्याची दखल सरकारने घेतली आहे. आता पाच टक्के सवलत दिली असून बेळगावच्या जनतेने त्याचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

स्वच्छ व सुंदर शहर करण्यासाठी जनतेच्या सहकार्याची गरज आहे. कर अधिक प्रमाणात जमा झाला तर शहरातील स्वच्छतेसह विविध विकासकामे राबविता येणार आहेत. तेव्हा आपला कर भरून जनतेने महानगरपालिकेला मदत करावी. आतापर्यंत 29 कोटी 11 लाख रुपये कर जमा झाला आहे. अजून 50 कोटी रुपये कर जमा करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे ते उद्दिष्ट गाठण्यासाठी आपले प्रयत्न सुरू राहणार आहेत. पूर परिस्थितीबाबत विचारले असता पूर नियंत्रणासाठी महानगरपालिकेने पाच पथकांची नेमणूक केली आहे. दोन दक्षिण व दोन उत्तर विभागात पथके तैनात राहणार आहेत. याचबरोबर दहा जणांचे एक पथक 24 तास कार्यरत राहणार आहे. पुरामुळे जीवितहानी किंवा इतर कोणतेही नुकसान होवू नये याची काळजी घेतली गेली आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ऑनलाईनद्वारे तसेच बेळगाव वनमध्ये जनतेने घरपट्टी भरावी. काही अडचण आल्यास महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयामध्ये येऊन भेटावे. येथील कर्मचारी निश्चितच त्यांची अडचण दूर करतील. सध्या गोवावेस व अशोकनगर येथील विभागीय कार्यालयामध्ये घरपट्टी जमा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तेव्हा जनतेने जास्तीतजास्त घरपट्टी भरावी, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

कठोर कारवाईचा इशारा 

शहरातील काही जण घरपट्टी भरण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. अनेक वर्षांची घरपट्टी त्यांच्याकडे प्रलंबित आहे. त्यांना नोटीस देऊनही त्यांनी घरपट्टी भरली नाही. त्यामुळे आता संबंधितांचे वीज कनेक्शन तसेच पाणी कनेक्शन बंद करणार असल्याचा इशारा मनपा आयुक्तांनी दिला आहे. यावेळी महसूल उपायुक्त गुरुनाथ दड्डे हे उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.