Ichalkaranji crime | पार्टीसाठी पैसे दे नाहीतर...'; इचलकरंजीत टोळक्याकडून घरात घुसून दहशत
इचलकरंजीत टोळक्याचा हल्ला
इचलकरंजी-गुन्हेगारी टोळक्याच्या खर्चासाठी ४० हजार रुपयांची खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे तरुणावर मारहाण करुन त्याच्या घरावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवार पेठ परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी गावभाग पोलिसांनी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून ६ जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत शिवराज जितेंद्र माने (वय २८, रा. मंगळवार पेठ, श्री रेणुका मंदिराजवळ) यांनी तक्रार दाखल केली आहे.
याबाबत घटनास्थळावरून आणि पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी शिवराज माने हे १२ एप्रिल रोजी रात्री सुमारे ११ वाजता पोटफाडी चौकातील शांतीनाथ शाळेजवळथांबले होते. यावेळी उमेश आरबोळे, ओंकार कदम, मोहिन जमादार, वैभव कोरवी, अभि मंत्री आणि शिवराज विजय चनविरे हे तेथे आले.उमेश आरबोळे याने टोळक्याच्याखाण्या-पिण्याच्या खर्चासाठी ४० हजार रुपयांची मागणी केली...
मात्र माने यांनी नकार दिल्याने संशयितांनी त्यांना मारहाण केली. यानंतर १३ एप्रिल रोजी रात्री उमेश आरबोळे, वैभव कोरवी, ओंकार कदम या पोलिस रेकॉर्डवरील तिघा गुन्हेगारांसह शिवराज चनविरे, योगेश बडोदेकर, मोहिन जमादार, अभि मंत्री, ओमकार काजवे आणि शकील गवंडी या ९ जणांनी पुन्हा माने यांच्या घरावर हल्ला केला. यावेळी घराच्या दरवाजावर कोयत्याने वार करण्यात आले तसेच घरासमोरील दुचाकींची कोयते व दगडांनी तोडफोड करण्यात आली. या प्रकारामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती.
चार दिवसांची पोलीस कोठडी
शिवराज माने यांच्या फिर्यादीनुसार गावभाग पोलिसांनी उमेश भाऊसो आरबोळे, वैभव भिकाजी कोरवी, ओंकार शितल कदम, शिवराज विजय चनविरे, योगेश संतोष बडोदेकर, मोहिन मेहमुद जमादार, अभि मंत्री, ओमकार काजवे आणि शकील गवंडी (सर्व रा. इचलकरंजी) या ९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी उमेश आरबोळे, वैभव कोरवी, ओंकार कदम, योगेश बडोदेकर, मोहिन जमादार आणि शिवराज चनविरे या सहा जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सुरू आहे.