Satara News : जांभे–बोगदा रस्त्यासाठी संपादित जमिनीचा मोबदला तात्काळ द्या; अन्यथा तीव्र आंदोलन –शिवसेना माजी जिल्हाप्रमुख सचिन मोहिते
सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांचा मोबदला संघर्ष
सातारा : MSIDC, महाराष्ट्र शासन तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जांभे ते बोगदा दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला अद्याप शेतकऱ्यांना मिळालेला नाही. मोबदला मिळण्यापूर्वीच या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांच्यासह संबंधित गावांतील ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. संपादित जमिनीच्या मोबदल्याबाबत तात्काळ निर्णय घेऊन सर्व ग्रामस्थांची संयुक्त बैठक बोलवावी, अशी ठोस मागणी यावेळी करण्यात आली.
सचिन मोहिते यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, येत्या १७ तारखेच्या आत सर्व संबंधित गावांतील ग्रामस्थांच्या बैठका घेऊन मोबदल्याचा प्रश्न मार्गी लावला नाही आणि तोपर्यंत रस्त्याचे काम सुरूच राहिले, तर सातारा शहरालगत असलेल्या बोगदा परिसरात शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे मोठे आंदोलन छेडले जाईल.या आंदोलनादरम्यान शासनाची किंवा खाजगी स्वरूपाची कोणतीही हानी झाल्यास त्यास जिल्हाधिकारी कार्यालय व महाराष्ट्र शासन पूर्णपणे जबाबदार राहील, असा ठाम इशाराही शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते यांनी दिला आहे.