निलजी-सांबरा विमानतळ रस्ता रुंदीकरणपूर्वी नुकसान भरपाई द्या
भरीव भरपाई देण्याची ग्रामस्थांची मागणी : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना निवेदन
वार्ताहर/सांबरा
निलजी ते सांबरा विमानतळापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. मात्र त्याआधी मालमत्तांचे व खुल्या जागांचे योग्य मूल्यमापन करून भरीव नुकसान भरपाई द्यावी, अशा आशयाचे निवेदन ग्रामस्थांनी सोमवारी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना दिले. सांबरा विमानतळावर सोमवारी जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य नागेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. निवेदनामध्ये म्हटले आहे की, रस्ता रुंदीकरणासाठी रस्त्याशेजारील मालमत्ताधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
रस्त्याचा योग्य सर्व्हे करून मालमत्ता, आस्थापने व खुल्या जागांचे योग्य मूल्यमापन व्हावे व भरीव नुकसान भरपाई देण्यात यावी. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी लक्ष्मी हेब्बाळकर यांनी निवेदन स्वीकारून संबंधित अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन याबाबत चर्चा करण्यात येणार आहे व कोणत्याही प्रकारे मालमत्ता व ग्रामस्थांवर अन्याय होऊ देणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असे आश्वासन दिले. निवेदन देताना सिद्धलिंगय्या कोन्नूर, मोहन अष्टेकर, जाकीर पटेल, सुधीर जोई, कल्लाप्पा पालकर, विनायक चिंगळे, डॉ. सुधाकर पाटील, वैभव मुतगेकर आदि उपस्थित होते.