कुपोषित बालकांच्या आरोग्याकडे लक्ष द्या
जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : प्रत्येक सामुदायिक आरोग्य केंद्रामध्ये कुपोषित बालकांवर वेळेत उपचार मिळावेत, यासाठी राखीव खाटा ठेवल्या जाणार आहेत. अशा बालकांवर तातडीने उपचार करावेत, अशा सूचना जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी केल्या आहेत. जिल्हा पंचायत सभागृहात आरोग्य विभागाच्या जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी अध्यक्षस्थानावरून काही सूचना केल्या. शहर भागातील दाखल होणाऱ्या रुग्णालयांमध्ये गर्भवती महिलांच्या नोंदी, प्रसूतीचा तपशील, लसीकरण, बालमृत्यू, माता मृत्यू आणि माता व बाल आरोग्याच्यासंदर्भातील तपशील वेळोवेळी आरोग्य खात्याकडे सुपूर्द करावा. अन्यथा अशांवर कारवाई करण्याचा इशाराही बैठकीत देण्यात आला. शिवाय खासगी रक्त पेढींकडून संकलित केलेल्या रक्तसंकलनापैकी 25 टक्के युनिट रक्त सरकारी हॉस्पिटलांना पुरवावे, अशा सूचनाही करण्यात आल्या. यावेळी आरोग्य कुटुंब कल्याण खात्याचे अधिकारी डॉ. एस. एस. गडेद, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. श्रीकांत सुणधोळी, डॉ. चेतन कंकणवाडी, कुष्ठरोग नियंत्रणाधिकारी डॉ. गीता कांबळे, डॉ. विश्वनाथ भोवी, डॉ. विवेक होन्नळी, डॉ. संजय दोडमनी यांसह तालुक्यातील वैद्याधिकारी उपस्थित होते.