For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

करावे तसे भरावे !

06:06 AM Feb 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
करावे तसे भरावे
Advertisement

नेहमीच वादग्रस्त निवेदनासाठी प्रसिद्ध असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी अमेरिकन संसदेत सकाळी केलेल्या भाषणात आपण भारत पाकिस्तान होणारे युद्ध बंद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि आपण जर ही भूमिका बजावली नसती तर पाकिस्तानमधील 3.5 कोटी जनता भारताच्या अणुहल्ल्यात दगावली असती. ट्रम्प यांनी असेही सांगितले की, आपल्याकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ हे वारंवार विनंती करीत होते तुम्ही जर आता हस्तक्षेप केला नाही तर आपला मृत्यू अटळ आहे शिवाय पाकिस्तानमधील साडेतीन कोटी माणसे मरण पावतील. आपण यात हस्तक्षेप केला त्यामुळेच हे युद्ध होऊ शकले नाही. भारताचे पंतप्रधान मोदी हे थोर आहेत. आपण केलेल्या मध्यस्थीला त्यांनीही मान्यता दिली, असे निवेदन त्यांनी केले. ट्रम्प हे वारंवार भन्नाट निवेदने करीत असतात आणि प्रत्येकवेळी नव्याने वाद निर्माण करण्याचे काम आजवर त्यांनी केले आहे. त्यांची निवेदने आंतरराष्ट्रीय पातळीवर फार गांभीर्याने घेतली जात नाहीत. तरीदेखील ते जे काही बोलले यातील दहा टक्के जरी खरे असले तरी देखील पाकिस्तानची त्यामुळे फार मोठी बदनामी यातून  झालेली आहे. अलीकडे पाकिस्तानने अमेरिकेवर फार मोठे प्रहार केलेले आहेत. पाकिस्तानने आम्हाला फसविले अशा पद्धतीने पाकिस्तानचे राजकीय नेते थेट संसदेत देखील बोलू लागले आहेत. पाकिस्तान हा सर्व बाजूंनी सध्या अडचणीत आहे. एक म्हणजे त्यांनी आपल्या मित्र देशाला चीनला फसविले आणि अमेरिकेशी मैत्री जोडली. परंतु अमेरिकेशी केलेली मैत्री ही फार काळ टिकू शकली नाही. ती अल्पावधीतच वाया गेली कारण अमेरिका त्यातल्या त्यात डोनाल्ड ट्रम्प हे फार धूर्त आहेत व आपल्या देशाचा फायदा नेमका कुठे आहे यावरच त्यांची काकदृष्टी असते. डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी अमेरिकन संसदेत केलेल्या निवेदनाने पाकिस्तानची पार गोची झाली आहे. अमेरिकेशी मैत्री करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न पूर्णत: फसला. एवढेच नव्हे तर पाकिस्तान त्यामुळे आपला जो जिगरीदोस्त चीन त्यालाही गमावून बसला. चीन हे राष्ट्र पाकिस्तानशी मैत्री यासाठीच करू पाहत आहे की त्यांचे लक्ष भारतावर आहे. भारत अति जलद वेगाने प्रगतीची शिखरे पार करीत आहे. हा देश एक महाशक्ती बनू पाहत असल्याने या देशाला अडचणीत आणण्यासाठी भारताचा शत्रू पाकिस्तानशी मैत्री जोडण्याचा प्रयत्न चीनने केला, त्यासाठी पाकिस्तानवर फासे टाकले आणि पाकिस्तान पूर्णत: चीनच्या मायाजालात अडकला. भारताच्या विरोधात पाकिस्तानला मदत करताना चीनने जी शस्त्रास्त्रs पाकिस्तानला पुरवली त्यातील बरीचशी कालबाह्य झालेली होती. भारताने जेव्हा ऑपरेशन सिंदूर सुरू केले त्यावेळी पाकिस्तानचा पार धुव्वा उडाला, पाकिस्तानची अपरिमित हानी झाली. अखेरीस पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे पाय धरले आणि त्यानंतर अमेरिकेनेदेखील काही अटी पाकिस्तानवर लादल्या व डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर देखील चर्चा केली, शेवटी दोन्ही राष्ट्रांनी शस्त्रसंधीचा निर्णय घेतला. अमेरिकेने मध्यस्थी केली, हे भारताने पूर्णत: नाकारले परंतु वस्तुस्थिती हीदेखील आहे भारताने हल्ला करायचा नाही हा निर्णय घेतला आणि पाकिस्तानने अगोदरच शस्त्रs म्यान केली. डोनाल्ड ट्रम्प यांचे निवेदन हे पूर्णत: खोटे म्हणता येणार नाही कारण पाकिस्तानने ट्रम्प यांच्याकडे मध्यस्थीसाठी जोरदार प्रयत्न केले. पाकिस्तानने अमेरिकेच्या अटीदेखील मान्य केल्या यामागील खरे कारण असे होते की, पाकिस्तानला भारताने बराच मार दिला. चीन थेट किंवा प्रत्यक्षपणे पाकिस्तानच्या मदतीला आला नाही. यामुळेच भारताचा मारा आणखी वाढला असता तर कदाचित हे महाभयंकर युद्ध झाले असते. त्यामुळे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आम्ही भारताविऊद्ध अणुयुद्ध करू शकतो अशी पोकळ धमकी दिली आणि अणुयुद्ध जर त्यांनी सुरू केले असते तर सर्वाधिक नुकसान हे पाकिस्तानचे झाले असते. भारताचेही नुकसान झाले असते परंतु प्रत्यक्षात याची जास्तीत जास्त झळ ही पाकिस्तानलाच बसली असती. पाकिस्तानला भीती होती की, भारत-पाकिस्तान युद्ध वाढत गेले तर पाकिस्तानमधील साडेतीन कोटी जनता मरण पावली असती. भारताच्या आक्रमकपणाला पाकिस्तान बराच घाबरून राहिला. भारताने जी अण्वस्त्रs पाकिस्तानवर सोडली त्याचा प्रतिकार करण्यात पाकिस्तान कमी पडला. डोनाल्ड ट्रम्प यांनी जे काही सांगितले त्यातील दहा टक्के जरी खरे ठरले तरी देखील पाकिस्तान फार अगतिकतेला आला होता हे सत्य आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकन संसदेमध्ये बुधवारी जे काही जाहीर केले त्यातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुकच केलेले आहे. याचा अर्थ अमेरिकेला जागतिक पातळीवर भारताचे महत्त्व कळलेले आहे. नकारात्मक दृष्टिकोन, नकारात्मक वागणे पाकिस्तानला फार अडचणीचे ठरणार आहे. सध्या अमेरिकेशी केलेली मैत्री पाकिस्तानला बरीच महागात पडली असून आता मागाहून अमेरिकेच्या नावाने शंख मारण्यात काही अर्थ राहिलेला नाही. देशाचे परराष्ट्र धोरण कसे असावे हे भारताकडून निश्चितच शिकावे. भारत नेहमीच संयमी भूमिका घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वांशी मैत्री करण्याच्या प्रयत्नात राहिला आहे. पाकिस्तान मात्र नेहमीच भारतावर प्रखर टीका करण्यात आपला वेळ खर्च करतो. पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरमुळे जे काही नुकसान झालेले आहे ते भरून काढण्यासाठी पाकिस्तानला आणखी काही वर्षे जावी लागतील. सध्या प्रचंड आर्थिक समस्येला तोंड देणाऱ्या पाकिस्तानसमोर संकटांच्या मालिका आहेत. एका बाजूने अफगाणिस्तान विरोधात कारवाया करताना बलुचिस्तानने पाकिस्तान सरकार विरोधात जो काही आक्रमकपणा दाखवलेला आहे, त्यातून पाकिस्तानला अधिक संकटात सापडलाय. त्यातच शेजारील भारत देशाबरोबर कट्टर शत्रुत्वाची बजावलेली भूमिका पाकिस्तानला अडचणीची ठरली आहे. चीन हा फार धूर्त आहे. त्यांनी पाकिस्तानमधील अनेक बंदरे आपल्या ताब्यात घेतलेली आहेत. पाकिस्तानवर कर्जाचा महाडोंगर उभा आहे अशा परिस्थितीत डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या संसदीय भाषणात जी काही माहिती दिली त्यातून पाकिस्तानची प्रचंड अब्रु धुळीला मिळाली आहे. करावे तसे भरावे हेच सत्य!

Advertisement

Advertisement
Tags :

.