पवार, केजरीवाल यांची जंतरमंतर भेट
दीपके यांच्याशी केली चर्चा, विद्यार्थ्यांची विचारपूस
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कॉक्रोच जनता पार्टीने जंतरमंतरवर आपले आंदोलन चालविले असून मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस (शप) चे नेते शरद पवार आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी जंतरमंतरवर जाऊन अभिजित दीपके यांच्याशी चर्चा केली आहे. पवार यांनी मंगळवारी दुपारी जंतरमंतरला भेट दिली. तेथे दीपके यांच्यासह काही आंदोलक अद्यापही आंदोलन करीत आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरु राहील, असे प्रतिपादन दीपके यांनी केले आहे. सोमवारी दीपके यांनी त्यांच्या प्राणांतिक उपोषणाची सांगता केल्याची घोषणा केली होती.
शरद पवार यांच्यापाठोपाठ आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनीही दीपके यांची भेट घेतली. त्यांनी आंदोलकांची चौकशी केली. केजरीवाल यांनी दिल्लीतील मंदीर मार्ग पोलीस स्थानकालाही भेट दिली. आमच्या पक्षाचा या आंदोलनाला पाठिंबा आहे, असे वक्तव्य केजरीवाल यांनी केले आहे. मंगळवारच्या आंदोलनाच्या काळात पोलिसांनी अनेक आंदोलकांना अटक केली होती. या आंदोलकांना पोलिसांकडून अन्न आणि पाणी दिले जात आहे, अशी माहिती नंतर केजरीवाल यांनी दिली. आंदोलकांवर अत्याचार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दीपके निवडणूक लढविणार ?
कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दीपके हे भविष्यात निवडणुकीच्या रणमैदानात उतरतील, अशी शक्यता भारतीय जनता पक्षाचे नेते आणि खासदार निशिकांत दुबे यांनी व्यक्त केली आहे. प्रत्येक आंदोलनातून एक नेता जन्माला येतो. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून लालू प्रसाद यादव यांचा उदय झाला. अरविंद केजरीवाल यांचा उदय अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून झाला. तथापि, दीपके यांची संघटना आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच नेते मानते. पंतप्रधान नरेंद्र मोदी समस्या आणि विवाद सोडवू शकतात, असा या संघटनेचा विश्वास आहे. दीपके हे कदाचित ‘भीम आर्मी’ या पक्षातून निवडणूक लढवितील. आंदोलकांचे नेते कालांतराने कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करतात, असा अनुभव आहे. त्यामुळे दीपके हाच मार्ग निवडतील, असे अनुमान त्यांनी व्यक्त केले.