सिंगापूरमधील दुर्घटनेत पवन कल्याणांचा पुत्र जखमी
वृत्तसंस्था/ सिंगापूर
अभिनेता आणि आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा पुत्र मार्क शंकर हा सिंगापूरमध्ये एका दुर्घटनेत जखमी झाला आहे. एका शाळेत आग लागल्याने मार्कच्या हात अन् पायांना ईजा झाली आहे. दुर्घटनेनंतर त्याला सिंगापूरमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या दुर्घटनेची माहिती कळताच पवन कल्याण हे सिंगापूरसाठी रवाना झाले आहेत.
पवन कल्याण हे आंध्रप्रदेशच्या अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. स्वत:चे निर्धारित कार्यक्रम पूर्ण केल्यावर सिंगापूरला जाण्याचा निर्णय घेतला आहे. अराकूनजीकच्या कुरीडी गावात येणार असल्याचे आश्वासन मी तेथील आदिवासींना दिले होते, याचमुळे मी त्या गावात जाणार आहे, त्यांच्याशी संवाद साधून तेथीय समस्या जाणून घेणार आहे. काही विकासकामांचा शुभारंभ केल्यावर सिंगापूरला पोहोचणार असल्याचे पवन कल्याण यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटले आहे. मार्क शंकरची प्रकृती स्थिर असून डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर नजर ठेवून आहेत.