For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उन्हापासून बचावासाठी उभारला मंडप

03:31 PM May 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
उन्हापासून बचावासाठी उभारला मंडप
Advertisement

महापालिकेचा पुढाकार : चन्नम्मा चौकात सावलीमुळे वाहनचालकांतून समाधान

Advertisement

बेळगाव : उष्णतेत दिवसेंदिवस वाढ होत चालली असल्याने जीव कासावीस होत आहे. विशेष करून ट्रॅफिक सिग्नलवर हेल्मेट परिधान करून थांबलेल्या वाहन चालकांच्या डोक्यातून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. उन्हामुळे जीव गुदमरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेत महानगरपालिकेकडून चन्नम्मा चौकात वाहनचालकांचा उन्हापासून बचाव व्हावा, यासाठी मंडप उभारण्यात आला आहे. यामुळे वाहनचालकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. यंदा उष्णतेच्या लाटेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने जनजीवनांवर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत उन्हाच्या झळा असह्या बनत आहेत. त्यामुळे नागरिक दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळत आहेत.

रस्त्यावरील गर्दी दुपारच्या वेळी रोडावत आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी नागरिक घराबाहेर पडणे पसंत करत आहेत. बाजारपेठेवरही परिणाम झाला असून उलाढाल मंदावली आहे. मे महिन्यात उष्णतेत आणखी वाढ होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य खाते अलर्ट झाले असून त्यांच्याकडून काही मार्गदर्शक सूची जारी करण्यात आली आहे. दुपारच्या वेळी प्रखर उन्हात बाहेर पडणे टाळावे, जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करावे, लहान मुले, पेशंट आणि वयोवृद्धांना थेट सूर्यप्रकाशात येणे टाळावे, हलके व सुती कपडे वापरावे, लिंबू पाण्याचे सेवन करावे आदी प्रकारच्या सूचना करण्यात आल्या आहेत. उष्माघातासारखे प्रकार घडल्यास संबंधित रुग्णांना तातडीचे उपचार मिळावे, यासाठी सिव्हिल

Advertisement

हॉस्पिटलमध्ये 10 बेड राखीव ठेवले आहेत. इतकेच नव्हे तर तालुका पातळीवरील इस्पितळामध्ये 5 बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. नोकरदार त्याचबरोबर इतर कर्मचारी वर्ग दुपारच्या वेळी कामानिमित्त प्रवास करत असतात. मात्र उन्हामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील रहदारीत वाढ होत असल्याने ट्रॅफिक सिग्नलवर दोन ते पाच मिनिटे थांबावे लागते काही ठिकाणच्या ट्रॅफिक सिग्नलजवळ झाडे असल्याने झाडाच्या सावलीत वाहनचालक थांबत आहेत. मात्र बहुतांश ठिकाणी सावली नसल्याने भर उन्हात वाहनचालकांना थांबावे लागत आहे. याचा विचार करून महानगरपालिकेकडून नुकताच चन्नम्मा चौकात एका सिग्नलवर मंडप उभारण्यात आला आहे. त्यामुळे डॉ. बी. आर. आंबेडकर मार्गाकडून चन्नम्मा सर्कलकडे वाहनचालक मंडपातील सावलीखाली थांबत आहेत. याचप्रमाणे अन्य ठिकाणीही मंडप उभारावेत, अशी मागणी वाहनचालकांतून केली जात आहे.

अन्य ठिकाणी मंडप उभारण्याची मागणी

ट्रॅफिक सिग्नलच्या ठिकाणी सेवा बजावणाऱ्या रहदारी पोलिसांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सरकारने काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. पोलिसांना सेवेच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, मास्क व आवश्यक सोयी उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत. चन्नम्मा सर्कलप्रमाणेच सम्राट अशोक सर्कल, धर्मवीर संभाजी चौक, सीबीटी, यंदे खूट, गोवावेस, आरपीडी सर्कल, ग्लोब सर्कल, गोगटे सर्कल, शिवाजी गार्डन आदी ठिकाणीही मंडपाची सोय करण्यात यावी, अशी मागणी वाहनचालकांतून केली जात आहे.

Advertisement
Tags :

.