For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पत्रादेवी हुतात्मास्मारक देशाच्या शौर्याचे प्रतीक

06:00 AM Aug 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
पत्रादेवी हुतात्मास्मारक देशाच्या शौर्याचे प्रतीक
Advertisement

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन : सर्वांनी नतमस्तक होण्याचे केले आवाहन

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

पेडणे : पत्रादेवी येथील हुतात्मा स्मृतीस्थळ हे केवळ गोव्याचे स्मृतिस्थळ नसून ते संपूर्ण देशाच्या शौर्य, त्याग आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक आहे. या पवित्र स्थळाला प्रत्येक भारतीयाने अभिवादन करावे, असे आवाहन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले.

Advertisement

पत्रादेवी येथे गोवा मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांच्या स्मृतींना समर्पित हुतात्मा स्मृती स्मारकाचे लोकार्पण संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल बुधवारी सायंकाळी करण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर, मांद्रेचे जीत आरोलकर, मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू आणि स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास देसाई उपस्थित होते.

भारताकडे अत्याधुनिक शस्त्रसामुग्री

भारताच्या संरक्षण क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा उल्लेख करताना राजनाथ सिंह म्हणाले की, पूर्वी भारताला शस्त्रास्त्रांसाठी परदेशांवर अवलंबून राहावे लागत होते; मात्र आज भारत अत्याधुनिक संरक्षण साहित्याची निर्मिती करून त्याची निर्यातही करीत आहे. भारताची वाढती संरक्षण क्षमता ही देशाच्या सामर्थ्याचे आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक असून, त्यामुळे जगाच्या पटलावर भारताची शान उंचावली आहे.

देशातील स्वातंत्र्यसैनिकांचे बलिदान

गोवा मुक्तिसंग्रामातील बलिदान केवळ गोमंतकीयांचे नव्हते, तर देशाच्या विविध भागांतून आलेल्या स्वातंत्र्यसैनिकांनीही गोवा मुक्तीसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल यांसह विविध राज्यांतील स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान गोवा मुक्तिसंग्रामाच्या इतिहासातील प्रेरणादायी अध्याय असल्याचे राजनाथ सिंग यांनी सांगितले.

बलिदान व्यर्थ जाता कामा नये

तऊण पिढीने या हुतात्म्यांच्या बलिदानाची अमरगाथा आपल्या स्मरणात कायम ठेवावी. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिले, त्याचप्रमाणे गोव्याच्या मुक्तीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांचे बलिदानही व्यर्थ जाता कामा नये. त्यांच्या स्मृती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी समाजाची आणि सरकारची आहे, असे त्यांनी नमूद केले.

एकाही हुतात्म्याचे नाव इतिहासातून निसटता कामा नये

गोव्याच्या मुक्तिसंग्रामात प्राणांचे बलिदान देण्राया एकाही हुतात्म्याचे नाव इतिहासातून सुटता कामा नये, यासाठी सखोल संशोधन करून सर्व हुतात्म्यांची माहिती संकलित करण्याचे आवाहनही राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना केले. ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांच्या त्यागाला योग्य सन्मान मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा सिंह यांनी व्यक्त केली.

हुतात्मा स्मारकाला भेट देताना केवळ सेल्फी काढण्यापुरते मर्यादित न राहता, या वीरांच्या बलिदानातून प्रेरणा घ्यावी आणि देशसेवेची भावना मनात जागृत ठेवावी, असे आवाहनही राजनाथ सिंह यांनी युवकांना केले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा मुक्तिसंग्रामाचा इतिहास व्यापक स्वरूपात पुढे आणण्याची गरज व्यक्त केली. पोर्तुगीज राजवटीविरोधातील गोमंतकीयांचा संघर्ष 1946 पूर्वीपासून सुरू होता. कुंकळ्ळीचा ऐतिहासिक उठाव हा या संघर्षातील महत्त्वाचा अध्याय असल्याचे त्यांनी सांगितले. 15 ऑगस्ट 1955 रोजी गोवा मुक्तीसाठी सत्याग्रह करण्राया असंख्य सत्याग्रहींनी पत्रादेवी येथे प्रवेश केला होता. पोर्तुगीज सत्तेच्या दडपशाहीला न जुमानता सत्याग्रहींनी केलेल्या संघर्षाची आणि हुतात्म्यांच्या बलिदानाची स्मृती जतन करणारे हे स्मारक भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणार आहे.

या सोहळ्यास सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, मत्स्यव्यवसायमंत्री नीळकंठ हळर्णकर, मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, डिचोलीचे  आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो,  मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट तसेच विविध सरकारी खात्यांचे अधिकारी, स्वातंत्र्यसैनिकांचे वारसदार, हुतात्म्यांचे कुटुंबीय आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वातंत्र्यवीरांवरील पुस्तकाचे प्रकाशन

यावेळी राजनाथ सिंग आणि इतर मान्यवरांच्या हस्ते गोवा मुक्ती स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली या स्वातंत्र्यवीरावर गोवा सरकारच्या वतीने काढलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

 पत्रकारांना, देशप्रेमींना अटकाव

आश्चर्याची बाब म्हणजे या सार्वजनिक कार्यक्रमासाठी पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला. कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या पत्रकारांना अडवण्यात आले. स्थानिक पत्रकारांना गेटवर प्रवेश पास विचारण्यात आले. तसेच त्यांना बसण्यासाठी आसन व्यवस्थाही करण्यात आली नव्हती. करोडो ऊपये खर्च करून आयोजित करणाऱ्या सोहळ्याला अनेक राष्ट्रप्रेमी आणि देशप्रेमी नागरिकांना बाहेरच थांबावे लागले.

Advertisement
Tags :

.