पाटना पायरेट्सची बेंगळूरवर मात
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2025 च्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या इलिमनेटर सामन्यात आयानच्या शानदार कामगिरीच्या जोरावर पाटना पायरेट्सने बेंगळूर बुल्सचा 46-37 अशा गुणफरकाने पराभव केला. आता पाटना पायरेट्सचा पुढील सामना तेलगु टायटन्सबरोबर होत आहे.
या स्पर्धेत पाटना पायरेट्सने आपली विजयी घोडदौड कायम राखताना सलग 8 सामने जिंकले आहेत. बेंगळूर विरुद्धच्या सामन्यात पाटना पायरेट्सच्या विजयाचा शिल्पकार हुकमी रायडर आयान ठरला. या सामन्यात आयानने 19 गुण मिळविले. आयानच्या आक्रमक खेळामुळे बेंगळूर बुल्सच्या खेळाडूंवर चांगलेच दडपण जाणवत होते. या सामन्यात बेंगळूर बुल्सतर्फे शुभम बिटकेने आपल्या चढाईवर 7 गुण वसुल केले. खेळ सुरू झाल्यानंतर अलिरझा मिर्झानने बेंगळूर बुल्सला पहिला गुण मिळवून दिला. त्यानंतर आयानने पाटना पायरेट्सचे खाते उघडले. पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत पाटना पायरेट्सने बेंगळूर बुल्सवर 9-3 अशी आघाडी मिळविली होती. या कालावधीत आयानने बेंगळूर बुल्सचे पहिल्यांदा सर्वगडी बाद केले. पाटना पायरेट्सने यानंतर बेंगळूर बुल्सवर 10 गुणांची बढत मिळविली. मध्यंतरापर्यंत पाटना पायरेट्सने बेंगळूर बुल्सवर 23-12 अशी भक्कम आघाडी मिळविली होती. आयानने सुपर 10 गुण नोंदवित बेंगळूर बुल्सवर चांगलेच दडपण आणले. अखेर पाटना पायरेट्सने हा सामना 46-37 अशा 9 गुणांच्या फरकाने जिंकून पुढील प्रवेश मिळविला.