वाहतूक कोंडीमध्ये घुसमटतोय रुग्णांचा जीव
बेळगाव : बेळगाव शहरातील वाढत्या ट्रॉफिकमुळे रुग्णवाहिकाही अडकू लागल्या आहेत. यामुळे अनेकांना रुग्णवाहिकेमध्येच अखेरचा श्वास घ्यावा लागत आहे. सोमवारी राणी चन्नम्मा चौक येथे सुरू असलेल्या आंदोलनामुळे अशाचप्रकारे दोन रुग्णवाहिका अडकून पडल्या होत्या. समाजमाध्यमांवर हा फोटो व व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शहराच्या रहदारीवरून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. शहरात पहाल तेथे वाहतूक कोंडीची समस्या सतावत आहे. काही ठिकाणी गटारी व पाण्याच्या वाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात आल्याने या वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
जिल्हाधिकारी तसेच पोलीस आयुक्तांनी राणी चन्नम्मा चौकात यापुढे आंदोलनांना परवानगी दिली जाणार नाही, असे सांगूनही आंदोलनांसाठी रस्ता बंद केला जात आहे. याच परिसरात सरकारी हॉस्पिटल असल्यामुळे जिल्ह्याभरातील रुग्ण या ठिकाणी आणले जातात. परंतु या ठिकाणच्या वाहतूक कोंडीमुळे अनेकवेळा रुग्ण रुग्णवाहिकेतच अखेरचा श्वास घेत आहेत. सोमवारी दोन रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकून पडल्या. अनेकवेळा सायरन वाजवूनही वाहनचालक बाजूला सरकले नाहीत. त्यामुळे बेळगावकर सामाजिक भान हरपले आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.