हृदयाचे ठोके 40 तासांपर्यंत बंद तरीही वाचला रुग्ण
चीनमध्ये एक इसम चमत्कारिक स्वरुपात अशा स्थितीतही बचावला आहे, ज्यात त्याचे हृदयाचे ठोके 40 तासांपर्यंत बंद राहिले. या घटनेने जीव वाचविण्याच्या नवीन चिकित्सा तंत्रज्ञानावरून ऑनलाइन चर्चा सुरू झाली आहे. झेजियांग विद्यापीठाच्या मेडिकल स्कूलच्या संलग्न रुग्णालयातील इमर्जन्सी डॉक्टर लू जियो यांनी ही घटना सोशल मीडियावर शेअर केली आहे. 40 वर्षीय एका इसमाला हृदयविकाराचा धक्का बसला होता, अनेकदा इलेक्ट्रिक डिफिब्dिरालेशननंतरही त्याचे हृदय धडधडणे सुरू झाले नव्हते. डॉक्टरांच्या टीमने त्या व्यक्तीवर एक्स्ट्राकॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन (ईसीएमओ) केले, त्यानंतर त्याचा जीव वाचू शकला आहे, परंतु त्याच्या हृदयाने जवळपास दोन दिवसांपासून धडधडणे बंद केले होते असे लू यांनी सांगितले आहे.
ईसीएमओ एक जीवनरक्षक यंत्र असून ते आर्टिफिशियल हृदय आणि फुफ्फुसांप्रमाणे काम करते. हे अशा लोकांच्या रक्तात ऑक्सिजन जोडते, आणि कार्बन डायऑक्साइड हटविते, ज्यांच्या अवयवांनी काम करणे बंद केले आहे. या मशीनचा वापर अनेकदा हृदयविकाराच्या धक्क्यांनी पीडित रुग्ण आणि हृदय तसेच फुफ्फुसांच्या प्रत्यारोपणाला सामोरे जाणाऱ्या लोकांना अस्थायी सहाय्यता प्रदान करण्यासाठी केला जातो. यंत्रामुळे हृदयविकाराचा धक्का बसल्याच्या अनेक तासांनंतरही लोकांना वाचविण्यात आले होते.
अनेक रुग्णांचा वाचला जीव
मागील वर्षी मध्य चीनच्या हुबेई प्रांतात एका 53 वर्षीय महिलेला हृदयाचे ठोके थांबल्याच्या 5 तासांनी पुन्हा जिवंत करण्यात आले होते. 2022 मध्ये पूर्व चीनच्या जियांग्सू प्रांतातील यानचेंग नंबर 1 पीपल्स हॉस्पिटलने 36 वर्षीय एका महिलेला ईसीएमओ यंत्राच्या मदतीने वाचविले होते. या महिलेचे हृदय 96 तासांपर्यंत धडधडत नव्हते. हे यंत्र हृदयाचे ठोके थांबलेल्या रुग्णांना वाचविण्याचा दर पारंपरिक सीपीआरकडून मिळणाऱ्या एका टक्क्यावरून वाढवत 50 टक्क्यांपर्यंत करू शकते. परंतु ईसीएमओ उपचाराला दीर्घ लांबविण्याची जोखीम देखील आहे. 40 वर्षीय या इसमाप्रकरणी रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून रोखण्यासाठी रक्ताचे पंपिंग वाढविण्याचे उपाय करावे लागले, जे घातक ठरू शकत होते असे डॉक्टर लू यांनी सांगितले आहे.
याचबरोबर वैद्यकीय पथकाला रक्ताच्या गुठळ्या निर्माण होणे आणि ब्लीडिंगदरम्यान संतुलन राखण्याची आवश्यकता असते, जी ईसीएमओची एक सामान्य आणि धोकादायक जटिलता आहे. याचा अर्थ निरंतर देखरेख आवश्यक आहे आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडे उत्कृष्ट कौशल्य असायला हवे. संबंधित व्यक्तीच्या हृदयाचे ठोके सामान्य झाल्यावर तो जवळपास 10 दिवसांपर्यंत ईसीएमओ उपचारावर जिवंत राहिला. 20 दिवसांनी तो जवळपास बरा झाला, स्वत: चालून रुग्णालयाबाहेर पडला. परंतु याच्या दुष्परिणामांमध्ये स्टोक, किडनी फेल्युयर, चिंता आणि नैराश्य यासारख्या मानसिक समस्या सामील असू शकतात. लू यांनी या घटनेला चमत्कार ठरवले आणि रुग्ण सुदैवी आहे, प्रत्येक यशस्वी उपचार वैद्यकीय जगतात झालेला विकास, डॉक्टर-नर्सेसची मेहनत आणि भाग्याचा परिणाम असतो असे म्हटले आहे.
अत्यंत खर्चिक
चीनमध्ये या यंत्राला चालू करण्यास कथित स्वरुपात जवळपास 7 हजार डॉलर्सचा खर्च येतो आणि त्यानंतर प्रतिदिन 10 हजार युआनहून अधिक खर्च येतो. या यंत्राद्वारे उपचार सर्वसाधारणपणे वैद्यकीय आरोग्य विम्याच्या कक्षेच्या अंतर्गतही येत नाही.