पाथुम निसंका लंकेच्या संघातून बाहेर, लाहिरू उदाराची निवड
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : पाकिस्तानविरुद्धच्या आगामी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मालिकेपूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. स्टार फलंदाज पाथुम निसंका दुखापतीतून पूर्णपणे सावरू न शकल्यामुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे.
9 नोव्हेंबरपासून रावळपिंडी येथे सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी निसंकाच्या जागी लाहिरू उदाराचा संघात समावेश करण्यात आला आहे. निसंकाला सुरुवातीला श्रीलंकेच्या कसोटी संघात स्थान देण्यात आले होते, परंतु तो वेळेत पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकला नाही. याच दुखापतीमुळे तो पाकिस्तानमधील अलीकडील मर्यादित षटकांच्या (व्हाइट-बॉल) मालिकेतूनही बाहेर होता, ज्यामध्ये टी-20 मालिका आणि इंग्लंड व यजमान पाकिस्तान यांचा समावेश असलेली वनडे तिरंगी मालिका होती. या त्रिकोणी मालिकेदरम्यान, इंग्लंडविरुद्ध वनडे इतिहासातील दुस्रया क्रमांकाचा यशस्वी पाठलाग (रन चेस) पूर्ण केल्यामुळे श्रीलंका चर्चेत आली होती.
लाहिरू उदारा आता कसोटी संघात सामील होईल; तो याआधी वनडे संघातही होता. यष्टिरक्षक-फलंदाज असलेल्या उदाराने यापूर्वी श्रीलंकेसाठी कसोटी आणि टी20 सामने खेळले आहेत. 2026 च्या सुरुवातीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मालिकेत त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम 188 धावांची खेळी केली होती. कुसल मेंडिसच्या नेतृत्वाखाली, श्रीलंका 9 नोव्हेंबर रोजी रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेची सुरुवात करेल. दुसरी कसोटी 17 नोव्हेंबरपासून लाहोरमध्ये खेळवली जाईल.
श्रीलंकेचा कसोटी संघ : कुसल मेंडिस (कर्णधार), अंजला बांदारा, दिनेश चंदिमल, धनंजय डी सिल्वा, सोनल दिनुशा, असिथा फर्नांडो, प्रभात जयसूर्या, लाहिरू कुमारा, दिलशान मदुशनका, एशान मलिंगा, कामिंदू मेंडिस, केशरा नुवान्था, मिलन रत्नायके, पासिंदू सूर्यबंदारा, लाहिरू उदारा.
