For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एनएसई आयपीओचा मार्ग मोकळा होणार

07:00 AM Apr 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
एनएसई आयपीओचा मार्ग मोकळा होणार
Advertisement

10 वर्षांनंतर सेबीला 1800 कोटींच्या तडजोडीला मंजुरी : पुढील महिन्यात अर्ज सादर करण्याची शक्यता

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

गुंतवणूकदार ज्या आयपीओची बऱ्याच काळापासून वाट पाहत आहेत, तो लवकरच शेअर बाजारात येऊ शकतो. नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच एनएसई आयपीओसाठी सेबीकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सेबीच्या तज्ञ समितीने एनएसईच्या सुमारे 1800 कोटी भरून प्रमुख नियामक समस्या सोडवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यामुळे एनएसई आयपीओचा मार्ग मोकळा होऊ शकतो. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, बाजारातील नियामक सेबीने एक बाह्य समिती स्थापन केली होती. या समितीने नॅशनल स्टॉक एक्सचेंजला (एनएसई) कायदेशीर समस्या स्वत:च सोडवण्याचा सल्ला दिला होता. यासाठी एनएसईला 1800 कोटींपेक्षा थोडी जास्त रक्कम भरावी लागणार असल्याची माहिती आहे. या शिफारशीमुळे जगातील सर्वात मोठ्या डेरिव्हेटिव्ह एक्सचेंजला आपला जुना वाद सोडवण्यास मदत होणार आहे. भारतीय प्रतिभूति आणि विनिमय मंडळ (सेबी) सोबत हा वाद सुरू आहे. एनएसईवर खराब प्रशासनाचा आरोप होता. असेही म्हटले गेले की, ते सर्व ट्रेडिंग सदस्यांना समान संधी देत नाही. या कारणांमुळे एनएसईचा आयपीओ जवळपास 10 वर्षांपासून रखडला आहे.

Advertisement

2016 पासून आयपीओ अडकला

एनएसईने ऑक्टोबर 2016 मध्ये सार्वजनिक होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली, जेव्हा त्यांनी आयपीओसाठीची पहिली मसुदा कागदपत्रे सेबीकडे सादर केली. दरम्यान काही समस्या, तांत्रिक प्रणाली आणि अंतर्गत नियंत्रणातील कमतरता यांसारख्या प्रशासकीय समस्यांमुळे ही योजना नंतर रखडली गेल्याचे समोर आले आहे.

पुढील महिन्यात अर्ज

मिळालेल्या माहितीनुसार, मार्च तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यानंतर एनएसई  पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत आयपीओसाठी अर्ज करू शकते. तसेच, सेबी  लवकरच एनएसईला पैसे जमा करण्यासाठी मागणी पत्र जारी करू शकते. यानंतर सेटलमेंट अंतिम करण्यासाठी आदेश जारी केला जाईल. गेल्या महिन्यात, एनएसईने आपला आयपीओ व्यवस्थापित करण्यासाठी 20 बँकांची नियुक्ती केली होती. भारतातील कोणत्याही आयपीओसाठी मतांची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे.

Advertisement
Tags :

.