For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आता वैश्य भवन हॉलचा मार्ग मोकळा!

आता वैश्य भवन हॉलचा मार्ग मोकळा
Advertisement

सावंतवाडी / वार्ताहर : शहरातील गवळीतीठा येथील वैश्य भवनमधील हॉल खासगी कंपनीला भाड्याने देण्याच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेला अर्ज सह धर्मादाय आयुक्त, कोल्हापूर यांनी नामंजूर केला असून, यापूर्वी दिलेला जैसे थे ठेवण्याचा आदेशही रद्द केला आहे. त्यामुळे 'ग्रोबिन टेक्नॉलॉजी' कंपनीला लिव्ह अॅण्ड लायसेन्स करारानुसार हॉलचा वापर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Advertisement

वैश्य भवनमधील हॉल 'ग्रोबिन टेक्नॉलॉजी' कंपनीला भाड्याने देण्याचा निर्णय तसेच कंपनीला हॉलमध्ये अंतर्गत कामकाज व वापर करण्यास मनाई व्हावी, यासाठी श्री. रमेश नागेश भाट आणि सौ. पुष्पलता केशव कोपरगावकर यांनी सह धर्मादाय आयुक्त, कोल्हापूर यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. या अर्जावरील प्राथमिक सुनावणीनंतर अंतिम निर्णय होईपर्यंत हॉलमध्ये कोणतेही काम करू नये, असा अंतरिम आदेश देण्यात आला होता.

मात्र, अंतिम सुनावणीनंतर सह धर्मादाय आयुक्तांनी २७ जुलै २०२६ रोजी दिलेल्या आदेशात अर्ज फेटाळून लावत पूर्वीचा जैसे थे आदेशही रद्द केला. निकालपत्रात सह धर्मादाय आयुक्तांनी नमूद केले आहे की, सन १९९५ पासून कार्यरत असलेल्या डी-फॅक्टो विश्वस्तांनी न्यासाच्या जागेवर वेळोवेळी बांधकाम केले असून, त्या इमारतीतील विविध भाग वेगवेगळ्या व्यावसायिक कारणांसाठी भाड्याने देण्यात आले आहेत. त्याबाबत यापूर्वी कोणताही वाद निर्माण झालेला नाही. त्याचप्रमाणे 'ग्रोबिन टेक्नॉलॉजी' कंपनीलाही लिव्ह अॅण्ड लायसेन्स कराराद्वारे जागा देण्यात आली असून, त्यामुळे न्यासाच्या मालमत्तेचा अपव्यय, नुकसान किंवा अनुचित हस्तांतरण होण्याचा कोणताही धोका प्रथमदर्शनी दिसून येत नाही.

Advertisement

तसेच, संबंधित कंपनीने आवश्यक चौकशी करूनच न्यासासोबत करार केला असून, या करारामुळे न्यासाच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या टप्प्यावर मनाई आदेश देण्याची आवश्यकता नसल्याचे सह धर्मादाय आयुक्तांनी नमूद केले.

याच कारणास्तव, न्यासाच्या मालमत्तेत कोणतेही अंतर्गत कामकाज करण्यास किंवा भाडेकरू म्हणून जागेचा वापर करण्यास ग्रोबिन टेक्नॉलॉजीला प्रतिबंध करण्याची गरज नसल्याचे निरीक्षण नोंदवत अर्जदार श्री. रमेश नागेश भाट व सौ. पुष्पलता केशव कोरगावकर यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला. तसेच, यापूर्वी जारी करण्यात आलेला जैसे थे आदेशही रद्द करण्यात आला आहे

Advertisement
Tags :

.