For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पटेल, तटकरे मार्गदर्शक मंडळात ॽ

06:18 AM Apr 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
पटेल  तटकरे मार्गदर्शक मंडळात ॽ
Advertisement

ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर पक्ष सावरण्याची जबाबदारी पडली आहे.  अशावेळी त्यांनी पूत्र पार्थ याला राज्यसभेवर खासदार बनवले. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना मार्गदर्शक अशी त्यांनी संभावना केली. परिणामी महाराष्ट्रात ही मंडळी ‘मार्गदर्शक मंडळात’ पाठवली जाण्याची चर्चा सुरु झाली.

Advertisement

भाजपचा आमदार खेचण्याचा प्रयत्न आणि शरद पवार यांच्या निकटवर्तीयांचा कौटुंबिक नियंत्रणाचा दबाव यांचा सुनेत्रा पवारांना सामना करावा लागत आहे. अजित दादांनी हयातीत सुनेत्रा यांना राज्यसभेवर पाठवण्यामागे दिल्लीत आपल्या कुटुंबातील हक्काच्या व्यक्तीची  उपस्थिती व निर्णय प्रक्रियेवर मांड राखण्याची दूरदृष्टी होती. आपल्या पक्षात आपलेच चालले पाहिजे आणि दूर दिल्लीत बसून कोणी आपला पक्ष दुसऱ्याच्या दावणीला बांधता कामा नये यासाठी त्यांनी आपल्या पत्नीला खासदार केले. हे राजकारण आता त्यांच्या पश्चात स्पष्ट होत आहे. केवळ सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव झाल्याने कुटुंबात शह देणे इतकेच  या निर्णयामागे कारण नव्हते. तर पक्षावर बळकट पकड ठेवण्याची अजितदादांची ती रणनीती होती. आता त्याच धर्तीवर सुनेत्रा पवार यांनी पूत्र पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवले!  पार्थ यांची उमेदवारी फेब्रुवारीत जाहीर झाली आणि मार्चमध्ये ते खासदार म्हणून निवडून आले.

नुकत्याच घडलेल्या घडामोडींनी पक्षात आधीपासून सुप्त असणारा तणाव अधिक गडद झाला आहे. गुरुवारी (2 एप्रिल) राज्यसभेचे नवनियुक्त खासदार पार्थ पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची भेट घेतली. भेटीत काय चर्चा झाली हे अद्याप सार्वजनिक झाले नाही. मात्र भेटीपूर्वी पार्थ यांनी ट्विट करून म्हटले, “प्रफुल्ल पटेलजी आणि सुनील तटकरेजी यांना लक्ष्य करून पसरवल्या जाणाऱ्या बातम्या निराधार आणि काल्पनिक आहेत. दोन्ही ज्येष्ठ नेत्यांची अनेक दशकांची निष्ठा आणि नेतृत्व आजही आम्हा सर्वांना मार्गदर्शक आहे.” असे म्हटले. या ट्विटमुळे अनेकांना वाटले की, पटेल-तटकरे यांना ‘मार्गदर्शक मंडळात’ रवानगी करण्याची सूचना राज्यात दिली गेली आहे. पार्थ यांनी ‘अशा ज्येष्ठ नेत्यांना काल्पनिक वादात ओढणे दुर्दैवी’ असेही म्हटले. पण मार्गदर्शक मंडळाच्या दिशेने देखील ही वाटचाल असू शकते त्यासाठीचा हा मानपान देखील मानला जाऊ शकतो.

Advertisement

दुसरीकडे, सुनेत्रा पवार यांनी 10 मार्चला निवडणूक आयोगाला पत्र लिहिले. त्यात 28 जानेवारी (अजित पवारांच्या निधनानंतर) ते स्वत:च्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या नियुक्तीपर्यंतचा सर्व पत्रव्यवहार ‘निरर्थक’ ठरवला. या पत्रात सुनेत्रा यांनी स्वत:ला फक्त ‘राष्ट्रीय अध्यक्ष’ आणि शिवाजीराव गर्जे यांना ‘खजिनदार’ असे उल्लेख केले. प्रफुल्ल पटेल (राष्ट्रीय कार्याध्यक्ष) आणि सुनील तटकरे (प्रदेशाध्यक्ष) यांच्या पदांचा उल्लेखच नाही! 16 फेब्रुवारीला पटेल-तटकरे यांनी आयोगाला लिहिलेल्या पत्रात कार्याध्यक्षांना अध्यक्षसारखे अधिकार मागितले होते. सुनेत्रा यांच्या पत्रामुळे ते पत्र रद्द ठरले. आता सुनेत्रा यांच्या अध्यक्षपदालाही धोका असल्याची चर्चा रंगली आहे. पटेल-तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन स्पष्टीकरण दिले, तरी वाद कायम आहे.

पक्षांतर्गत हा संघर्ष चालू असताना भाजपची ऑपरेशन लोटस रणनीती सक्रिय आहे. अजित दादांच्या निधनानंतर महायुतीतील 25-30 आमदारांना ओढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपने एनसीपी आमदारांच्या कुटुंबीयांना लक्ष्य केले. शरद पवार गटाकडून विलीनीकरणाची मागणी जोरात आहे. रोहित पवार यांनी पटेल-तटकरे यांच्यावर पूर्वनियोजित कटाचा आरोप केला. मात्र सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात अजितदादा पक्ष स्वतंत्र राहण्याची शक्यता वाढली आहे.

सुनेत्रा पवार यांच्यासमोर प्रशासकीय अनुभवाचा अभाव, बारामती उपनिवडणूक, महायुतीत संतुलन आणि पक्ष संघटन मजबूत करणे ही आव्हाने आहेत. पार्थ यांच्या दिल्लीतील उपस्थितीमुळे पार्थ पर्व सुरू झाले असल्याचे मानले जाते. यापुढे सुनेत्रा पवार यांचा ‘कस’ खरोखरच लागणार आहे. पार्थ यांचा ट्विट आणि सुनेत्रा यांचे  निवडणूक आयोगाला दिलेले पत्र हे  कौटुंबिक राजनीतीचे भाग आहेत, पण त्यातून पक्षात नवे वादळ निर्माण झाले आहे. पटेल-तटकरे यांना ‘मार्गदर्शक’ ठरवणे हा एकेकाळचा ‘कट’ उलटवण्याचा डाव आहे, तरी ते ज्येष्ठ नेते आजही काही बाबतीत पक्षासाठी महत्त्वाचे आहेत याची सुनेत्रा पवार यांना चांगली जाण आहे. भाजपचा दबाव आणि शरद पवार यांचा अप्रत्यक्ष प्रभाव यातून बाहेर पडणे सोपे नाही. सुनेत्रा पवार यांनी पारदर्शकपणे, घरातील एकतेच्या बळावर आणि जनमुद्यांवर लक्ष केंद्रित केल्यास अजित पवारांचा हा वारसा आणि वरचष्मा टिकेल. अन्यथा राष्ट्रवादी भाजपच्या ‘लोटस’चा बळी ठरेल किंवा शरद गटात विलीनही होईल. महाराष्ट्र राजकारणात पवार कुटुंबीयांची भूमिका निर्णायक राहील, पण ती सुनेत्रा पवार  यांच्या दूरदृष्टी आणि पार्थ यांच्या दिल्लीतील सक्रियतेवर अवलंबून आहे.

शिवराज काटकर

Advertisement
Tags :

.