पाटाकडील (अ) संघाची खंडोबावर दोन गोलने मात
केएसए (लीग) वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धा
झुंजार क्लबचा प्रॅक्टीस क्लबवर टायब्रेकरमध्ये 3-2 ने विजय
कोल्हापूर
शाहू छत्रपती केएसए वरिष्ट गट फुटबॉल स्पर्धेअंतर्गत रविवारी झालेल्या सामन्यात झुंजार क्लबने प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचा टायब्रेकरमध्ये 3-2 गोलफरकाने पराभव केला. दुसऱ्या सामन्यात स्पर्धेमध्ये पिछाडीवर राहिलेल्या पाटाकडील तालीम मंडळ (अ) संघाने मुसंडी मारत खंडोबा तालीम मंडळावर 2-0 गोलने विजय मिळवला.
झुंजार क्लब व प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यात पहिला सामना झाला. या सामन्यातील तिसऱ्याच मिनिटाला शाहू भोईटेने प्रॅक्टीसवर गोल नोंदवून झुंजारला आघाडी मिळवून दिली. यानंतर 23 व्या मिनिटाला प्रॅक्टीसच्या शिवम पोवारने झुंजारवर गोल करत सामना 1-1 गोलबरोबरीत आणला. यानंतर पुर्वार्ध संपेपर्यत दोन्हीही संघांना अधिकचा गोल करता आला नाही. उत्तरार्धातही ना झुंजारला निर्णायक गोल करता आला ना प्रॅक्टीसला. त्यामुळे सामना 1-1 गोलबरोबरीतच सुटला. त्यामुळे सामना विजयाचा फैसला करण्यासाठी टायब्रेकर अवलंबला. यात प्रॅक्टीसच्या ओंकार घुगरी व अनिकेत कोळे यांनी गोल केले तर झुंजारच्या अक्षय पाटील, निखील डाकरे व शाहू भोईटे यांनी गोल केले. या गोलच्या जोरावरच झुंजारचा प्रॅक्टीसवर 3-2 गोलफरकाने विजय झाला.
पाटाकडीलचा रोमहर्षक विजय
पाटाकडील (अ) संघ व खंडोबा तालीम मंडळ यांच्यात दुसरा सामना झाला. सामन्याचा पुर्वार्ध सुरू होऊन काहीच मिनिटे होतात तोवरच चाल करुन आलेल्या पाटाकडीलच्या अंशीद अलीला खंडोबाच्या ओंकार लायकरने आपल्या मोठ्या डीमध्ये धोकादायकरित्या अडवले. त्यामुळे मुख्यपंचांनी पाटाकडीलला पेनल्टी दिली. मात्र अक्षय पायमलने मारलेली पेनल्टी गोलरक्षक डेबीजीत घोषालने अडवून खंडोबाला गोलच्या धोक्यापासून वाचवले. यानंतर खंडोबाने जोरदार चढाया करत पाटाकडीलचे गोलजाळे लक्ष्य केले. पूर्वार्धात दोन्हीही संघांना एकही गोल करता आला नाही. उत्तरार्धात पाटाकडील व खंडोबाने एकमेकांच्या तोडीस तोड खेळ केला. एकमेकांवर चालीही केल्या. परंतू दोन्हीही संघांच्या बचावफळीने चाली निकामी केल्या. मात्र 65 व्या मिनिटाला पाटाकडीलने थेट गोलक्षेत्रातपर्यंत केलेली चाल खंडोबाच्या बचावफळीला रोखता आली नाही. या चालीतून नबी खानने दिलेल्या पासवर प्रथमेश हेरेकरने खंडोबावर गोल करत पाटाकडीलला आघाडी मिळवून दिली. आपल्यावर झालेल्या गोलमुळे खंडोबा संघातील खेळाडू थोडेसे बिथरले. 72 व्या मिनिटाला खंडोबाच्या खेळाडूने चेंडूला आपल्या खेळाडूकडे मारण्यात चुक केली. यावेळी चेंडूला ताब्यात घेऊन नबी खानने गोलसाठी ओंकार मोरेला पास दिला. हवेतून आलेल्या पासवर ओंकारने खंडोबावर हेडद्वारे अगदी गोल करत पाटाकडीलला 2-0 गोलची आघाडी मिळवून दिली. यानंतर सामन्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत खंडोबाला आपल्यावरील गोलची परतफेड करता आली नाही. परिणामी सामन्यात पाटाकडीलचा खंडोबावर 2-0 गोलने विजय झाला.