पॅट कमिन्स विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
वृत्तसंस्था/ मेलबोर्न
भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाने 7 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज तसेच उपयुक्त फलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे सहभागी होऊ शकणार नाही. या वृत्तामुळे ऑस्ट्रेलियन संघाला फार मोठा धक्का बसला आहे. आता कमिन्सच्या जागी ऑस्ट्रेलियन संघामध्ये बेन ड्वेरहुईसला संधी देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पॅट कमिन्सला वारंवार पाठ दुखापतीच्या समस्येने चांगलेच दमविले होते. इंग्लंड विरुद्ध झालेल्या अॅशेस मालिकेत कमिन्स केवळ एका कसोटी सामन्यात खेळू शकला होता. या पाठ दुखापतीच्या समस्येमधून पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी कमिन्सला आणखी काही कालावधी लागेल, असे क्रिकट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने सांगितले. टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व मिचेल मार्शकडे सोपविण्यात आले आहे. सध्या मार्शच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ पाकच्या दौऱ्यावर तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहेत. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाककडून ऑस्ट्रेलियाला पराभव पत्करावा लागला होता. ऑस्ट्रेलियन संघातील मॅट रेन्शॉने पाकविरुद्धच्या या सामन्यात आपले टी-20 प्रकारातील पदार्पण केले होते. आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन संघात मॅथ्यू शॉर्टच्या जागी मॅट रेन्शॉचा समावेश करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियन संघ - मिचेल मार्श (कर्णधार), हेड, बार्टलेट, हॅझलवूड, कोनोली, इंग्लिश, डेव्हिड, कुहेनमन, ड्वेरहुईस, मॅक्सवेल, ग्रीन, रेन्शॉ, इलिस, स्टोइनिस आणि झंपा.