बेंगळूर मार्गावर 745 प्रवाशांचा प्रवास मार्गक्रमण करताना प्रवाशांना सोईस्कर
बेळगाव : सलग सुट्या असल्याने बेळगावहून बेंगळूर मार्गावर बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून अनेक बसेस सोडण्यात आल्या होत्या. यामुळे प्रवाशांना मार्गक्रमण करण्यात समस्या आल्या नाहीत. रविवारी बेंगळूर येथे विविध मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये कार्यरत असणारे व इतर प्रवाशांनी मध्यवर्ती बसस्थानकात दिवसभरात गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले. बेळगाव विभागातून रविवारी दिवसभरात बेंगळूर मार्गावर एकूण 15 बसेस सोडण्यात आल्या होत्या. बेंगळूरला जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन व्होल्वो ही एक राखीव बस सोडण्यात आली होती. दरम्यान, रविवारी 745 प्रवाशांनी बेंगळूर मार्गावर प्रवास केला. यामुळे प्रवाशांना सोईस्कर ठरल्याचे पाहावयास मिळाले असले तरी बसस्थानकात प्रवाशांनी गर्दी केल्याचे दिसून आले. शनिवारी बकरी ईद व रविवारी सुटी असल्याने बेंगळूरसह विविध भागातील नागरिक आपापल्या गावी आले होते. ते रविवारी सुटी संपवून आपापल्या कामावर रुजू होण्यासाठी मार्गस्थ झाले. रविवारी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत 14 नियमित बसेस सोडण्यात आल्या होत्या. बेंगळूरसाठी आरक्षण करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन व्होल्वो ही राखीव बस सोडण्यात आली होती. या बसेसद्वारे नियमित बसेसमधून 700 प्रवासी बेंगळूर मार्गावर मार्गस्थ झाले. राखीव असलेल्या व्होल्वो बसमधून बेंगळूरसाठी 45 प्रवाशांनी प्रवास केला. असे एकूण 745 प्रवाशांनी बेळगावहून बेंगळूर मार्गावर प्रवास केल्याचे पाहावयास मिळाले.