रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल
पाच ते सहा तास उशिराने रेल्वे दाखल, रेल्वेतील लहान मुले-वृद्धांची गैरसोय
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव
नैर्त्रुत्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने मंगळवारी हुबळीमार्गे बेळगावला येणाऱ्या रेल्वे तीन ते चार तास उशिराने धावत होत्या. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. मिरजच्या दिशेने जाण्यासाठी थांबलेल्या नागरिकांना बराचकाळ वाट पाहावी लागली. तर बेंगळूरहून बेळगावला येणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.
रेल्वेकडून दुरुस्तीचे काम केले जात असल्याने एक्स्प्रेस विलंबाने दाखल झाल्या. धारवाड-पंढरपूर एक्स्प्रेस सकाळी 8.30 वाजता बेळगावला येणे गरजेचे होते. परंतु दुपारी 12 पर्यंत ही गाडी धारवाडमधून निघालीच नाही. अखेरीला दुपारी 12 नंतर नैर्त्रुत्य रेल्वेच्या वेबसाईटवरून ही एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. यामुळे रेल्वेची वाट पाहात प्रवाशांना ताटकळत थांबावे लागले. अखेर दुसऱ्या रेल्वेने प्रवास करावा लागला.
बेंगळूरहून येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल
बेंगळूरहून बेळगावला येणाऱ्या राणी चन्नम्मा एक्स्प्रेस व सुपरफास्ट एक्स्प्रेस मंगळवारी चार तास उशिराने बेळगावला आल्या. सकाळी 8.50 वाजता येणारी राणी चन्नम्मा एक्स्प्रेस दुपारी 1 च्या सुमारास बेळगावला आली. तर सुपरफास्ट एक्स्प्रेसही बेळगावला उशिराने दाखल झाली. यामुळे प्रवाशांना चार तास रेल्वेतच बसून राहावे लागले. काही ठिकाणी पिण्याचे पाणी व अल्पोपाहार उपलब्ध न झाल्याने प्रवाशांनी प्रचंड संताप व्यक्त केला.
लोंढा यार्डमध्ये एनआय वर्क
नैर्त्रुत्य रेल्वेकडून लोंढा रेल्वेस्थानकातील यार्डचे नॉन इंटरलॉकिंग काम सुरू होते. याची पूर्वसूचना काही दिवसांपूर्वीच देण्यात आली होती. परंतु हे काम लांबल्याने एक्स्प्रेस उशिराने बेळगावला धावत होत्या. दुपारी 1 नंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
-मंजुनाथ कलमडी, जनसंपर्क अधिकारी, नैर्त्रुत्य रेल्वे
कोणती रेल्वे किती तास उशिराने....
►बेंगळूर-सांगली (राणी चन्नम्मा एक्स्प्रेस)-3 तास 56 मिनिटे
►म्हैसूर-बेळगाव- 3 तास 45 मिनिटे
►बेंगळूर-जोधपूर एक्स्प्रेस- 3 तास 58 मिनिटे
►बेंगळूर-बेळगाव- 6 तास 30 मिनिटे
►सिकंदराबाद-बेळगाव- 3 तास 35 मिनिटे
►तिरुपती-कोल्हापूर- 4 तास 35 मिनिटे
►एर्नाकुलम-पुणे (पुर्णा एक्स्प्रेस)- 1 तास 32 मिनिटे
►हुबळी-मिरज- 1 तास 12 मिनिटे