प्रवासी बाहेर, भटकी जनावरे बसस्थानकात!
शहर परिसरातील चित्र : आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाने पावले उचलण्याची मागणी : भटक्या जनावरांचा बंदोबस्त करा
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरात सर्वत्र मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे. यातच पावसाचा परिणाम नागरिकांसह भटक्या जनावरांवरही होत आहे. यामुळे भटकी जनावरे पावसापासून बचावासाठी बसस्थानकात आसरा घेत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे प्रवासी बाहेर व जनावरे बसस्थानकात असे चित्र दिसून येत आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बसस्थानक व धर्मवीर संभाजी महाराज चौक परिसरातील बसस्थानकात भटक्या जनावरांचा वावर पहावयास मिळत आहे. परिणामी अस्वच्छतेमुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे. यामुळे प्रशासनाने वेळीच जनावरांना निवारा केंद्रात दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
बसस्थानकातील भटक्या जनावरांचा वावर ही एक गंभीर समस्या बनली आहे. बसस्थानकांमध्ये विशेषत: रात्रीच्यावेळी भटक्या जनावरांचा वावर वाढलेला दिसतो. जनावरांमुळे बसस्थानके अस्वच्छ बनत असून दुर्गंधीही पसरत आहे. यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याचा धोका निर्माण झाला आहे. समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाने एकत्रितपणे उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी लवकरात लवकर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
रहदारीस अडथळा
शहर व उपनगरात पाऊस सुरूच आहे. यामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे. यातच भटक्या जनावरांच्या उपद्रवामुळे नागरिक, वाहनधारक व व्यावसायिक हैराण झाले आहेत. पावसाळा सुरू होताच भटकी जनावरे पोलीस स्थानक, आठवडी बाजार, बसस्थानके, आरटीओ सर्कल, तसेच ठिकठिकाणी झुंडीने फिरत असतात. काहीवेळा रस्त्यातच ठाण मांडून बसत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. जनावरांमुळे वाहनांना धक्का बसून अपघाताचा धोका उद्भवण्याची शक्यताही आहे.
वर्दळीच्या ठिकाणी उपद्रव
भटक्या जनावरांच्या उपद्रवामुळे रहदारी, बसस्थानके, सार्वजनिक ठिकाण, बाजारपेठ, व्यावसायिकांवर मोठा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे या ठिकाणाला गोठ्याचे स्वरूप प्राप्त होत आहे. आरटीओ सर्कल ते धर्मवीर संभाजी महाराज चौक मार्गावर अनेक शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, न्यायालय आहे. यामुळे या मार्गावर सतत वर्दळ असते. मात्र भटक्या जनावरांमुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
प्रशासनाकडून पावले उचलण्याची गरज
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहर परिसरात ठिकठिकाणी नूतन बसस्थानके निर्माण करण्यात आली आहेत. पण ही बसस्थानके भटक्या जनावरांसाठी आश्रयस्थान बनली आहेत. जनावरांच्या मुक्त संचारामुळे प्रवाशांवर परिणाम होत असून प्रशासनाने वेळीच पावले उचलण्याची आवश्यकता आहे. तसेच प्रवाशांच्या आरोग्याची दखल घेऊन व जनावरांच्या संगोपनाच्यादृष्टीने भटक्या जनावरांचा बंदोबस्त करून त्यांची रवानगी निवारा केंद्रात करण्याची मागणी होत आहे.
प्रवाशांवर पावसात भिजत राहण्याची वेळ...
रात्रीच्यावेळी भटकी जनावरे बसस्थानकांमध्ये आश्रयासाठी येत असल्याने सर्वत्र अस्वच्छता निर्माण होत आहे. शहरात शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. यातच दिवसभर जनावरे बसस्थानकात ठाण मांडून बसत असल्याने जनावरे बसस्थानकात तर विद्यार्थ्यांसह प्रवासी बाहेर असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे बस किंवा इतर वाहनांच्या प्रतीक्षेत पावसात भिजत रहावे लागत आहे.