अपुऱ्या बससेवेमुळे प्रवाशांची गैरसोय
महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसेस वळविल्या पंढरपूरला
त. भा. प्रतिनिधी
बेळगाव
बेळगावहून कोवाड, आजरा या भागात जाणाऱ्या प्रवाशांची शनिवारी प्रचंड गैरसोय झाली. महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बस बेळगावमध्ये कमी आल्याने प्रवाशांना तासान्तास थांबून रहावे लागले. त्यामुळे चंदगड बसस्टॉप येथे प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.
महाराष्ट्र परिवहन महामंडळाने शनिवारी आपल्या ताफ्यातील लालपरी पंढरपूरला वळवल्याने बस कमी असल्याचे उत्तर देण्यात आले. अनेकजण खरेदीसाठी बेळगावमध्ये आले होते. परंतु परतीच्या प्रवासास त्यांच्यासाठी बस उपलब्ध होत नसल्याने बसची वाट पाहत थांबावे लागले. यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. किमान प्रवाशांना पूर्वकल्पना देणे आवश्यक होते.
फोन करून व्यक्त केली नाराजी
परिवहन मंडळाची बस उपलब्ध नसल्याने अखेर खासगी वाहतुकीचा पर्याय निवडावा लागला. यामुळे टमटम, मॅक्सीकॅप तसेच रिक्षाने कोवाड, आजरा, नेसरी गाठावे लागले. यासाठी विलंब लागल्याने प्रवाशांनी चंदगड, आजरा परिवहन मंडळाच्या व्यवस्थापकांना फोन करून आपली नाराजी व्यक्त केली.