सावंतवाडी टर्मिनससाठी प्रवासी संघटनेकडून प्रजासत्ताक दिनी रेल रोको
न्हावेली / वार्ताहर
भूमीपूजन होऊन तब्बल ९ वर्षे उलटूनही अद्यापही अपूर्ण अवस्थेत असलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनस बाबत सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेकडून प्रशासनाला जाग आणण्यासाठी येत्या प्रजासत्ताक दिनी सावंतवाडी रेल्वे स्थानक येथे मोठ्या प्रमाणात प्रवासी एकञ करून रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. रेल्वे प्रवासी संघटनेकडून वेळोवेळी आंदोलने करूनही मागण्यांची दखल घेतली जात नसल्या कारणाने नाराज झाल्याने अखेर रेल रोको आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.याबाबतची नोटीस प्रवासी संघटनेकडून सावंतवाडी रेल्वे स्थानक स्टेशनमास्तर यांना देण्यात आली.या नोटीस मध्ये असे म्हटले आहे की, सावंतवाडी रोड स्थानकावर प्रस्तावित टर्मिनसचे भूमिपूजन दिनांक २० जून २०१५ रोजी मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, मा. रेल्वे मंत्री श्री सुरेश प्रभू, मा. पालकमंत्री श्री दिपक केसरकर, मा. खासदार श्री विनायक राऊत, लोकप्रतिनिधी, व रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेले आहे. तसेच या कामाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन देखील झाले आहे, असे असताना या स्थानकाच्या नामकरणाचा विषय अजूनही प्रलंबित आहे. याचबरोबर २६ जानेवारी २०२४ रोजी संघटनेतर्फे सावंतवाडी स्थानकावर लाक्षणिक उपोषण आंदोलन देखील करण्यात आले होते. त्यावर देखील आपणाकडून आलेल्या पत्रात असंख्य चुका करण्यात आल्या होत्या. आपण अजूनही सावंतवाडी येथील टर्मिनसच्या कामावर आणि येथील प्रवासी सुविधांवर गंभीर नाहीत हेच यावरून निदर्शनास येते. १५ ऑगस्ट ला केलेल्या घंटानाद आंदोलनावेळी देखील लोकप्रतिनिधींकडून मिळालेल्या शाब्दिक आश्वासनापलीकडे काहीही ठोस कृती झाली नसल्याने पुन्हा एकदा शेवटचा पर्याय म्हणून रेल रोको करण्याचा निर्धार संघटनेकडून करण्यात आला. तसेचं कोकण रेल्वे महामंडळाने सावंतवाडी येथील टर्मिनसच्या उर्वरित कामासाठी निधीची तरतूद करावी. कोकण रेल्वे महामंडळाने सावंतवाडी टर्मिनसच्या नामकरण संदर्भात आपला प्रस्ताव संबंधित प्रशासनाला पाठवावा. कोकण रेल्वे महामंडळाने सावंतवाडी स्थानकाचा समावेश केंद्राच्या अमृत भारत स्थानक योजनेत करण्यासाठी पुन्हा एकदा योग्य तो पाठपुरावा संबंधित प्रशासनाकडे करावा. सावंतवाडी स्थानकात मंगलोर, राजधानी, वंदे भारत या रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा. सावंतवाडी स्थानकावरून कल्याण पुणे मार्गावर नवीन ट्रेन चालू करणे. सावंतवाडी ते बेळगाव ह्या नवीन रेल्वे मार्गाचे काम सुरु करणे. या मागण्या संघटनेकडून करण्यात आल्या आहेत, या मागण्या मान्य न झाल्यास प्रजासत्ताक दिनी मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवासी एकञ येऊन रेल रोको करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. सावंतवाडी टर्मिनस परिपूर्ण व्हावे त्यासाठी अंगावर केसेस आल्या तरी चालतील असा पवित्रा संघटनेकडून करण्यात आला, या वेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीचे सचिव श्री मिहिर मठकर, सल्लागार श्री सुभाष शिरसाट, श्री नंदू तारी, श्री मेहुल रेडीज, आणि रिक्षा व्यावसायिक आदी उपस्थित होते.