दोन रेल्वे विभागांच्या वादात प्रवाशांची होतेय कुचंबणा
हुबळी-मिरज स्थानकांवर एक्स्प्रेसमध्ये पाणी भरण्यास टाळाटाळ
प्रतिनिधी/ बेळगाव
दक्षिण भारतातून येणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये मिरज येथे पाणी भरण्यास अटकाव केला जातो तर हुबळी येथे रेल्वेमध्ये पाणी भरण्यासाठी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. रेल्वेमध्ये पाणीच नसल्याने स्वच्छतागृह योग्यप्रकारे वापरता येत नाहीत. याचा फटका प्रवाशांना बसत असल्याने मध्य रेल्वे व नैर्त्रुत्य रेल्वेने आपल्या कार्यक्षेत्रातील वाद मिटवून प्रवाशांची सोय करण्याची मागणी केली जात आहे.
केवळ आठ दिवसांत दोन एक्स्प्रेसमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. मागील आठवड्यात मिरज येथे दोन ते अडीच तास एक्स्प्रेस थांबवून पाण्यासाठी प्रवाशांनी आंदोलन केले. पुन्हा शुक्रवारी हुबळी-दादर एक्स्प्रेसमध्ये पाण्याचा तुटवडा असल्याची तक्रार एका प्रवाशाने केली. वारंवार असे प्रकार होत असल्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. हुबळी जंक्शनवर पाणी भरण्याची व्यवस्था आहे. परंतु, दैनंदिन एक्स्प्रेसची संख्या पाहता पाणी न भरताच एक्स्प्रेस पुढे पाठविल्या जातात.
दक्षिण भारतातून येणाऱ्या शरावती एक्स्प्रेस, हुबळी एक्स्प्रेस, हरिप्रिया एक्स्प्रेस यासह इतर गाड्यांमध्ये मिरज रेल्वेस्थानकात वेळच्यावेळी पाणी भरले जात नसल्याची तक्रार वारंवार केली जात आहे. हुबळी रेल्वेस्थानकात पाणी न भरताच या एक्स्प्रेस पुढे सोडल्याने मिरज जंक्शनमधील अधिकारीही दुर्लक्ष करीत आहेत. गाडीमध्ये अर्धवट पाणी भरून त्या पुढे सोडल्या जातात. त्यामुळे पुणे जंक्शन येईपर्यंत प्रवाशांना पाण्याची वाट पहावी लागते. असे प्रकार मागील काही दिवसांत वारंवार घडत आहेत. दक्षिण भारतातून येणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये आम्ही का पाणी भरावे? असा काहीसा सूर मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
जून महिन्याच्या अखेरीला तिरुवेनवेल्ली-दादर एक्स्प्रेसमध्ये हुबळी व मिरज येथेही पाणी भरण्यात आले नाही. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी तब्बल तीन तास मिरज येथे रेल्वे रोखून धरली. रेल्वेत पाणी भरल्यानंतरच ती पुढे सोडण्यात आली. पाणी नसल्यामुळे विशेषत: महिला प्रवाशांची मोठी कुचंबणा होते. तिकीट काढूनही सोयी दिल्या जात नसल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.