सावंतवाडी - पुणे बस तब्बल २ तास न सुटल्याने प्रवाशांचा चढला पारा
सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी आगारातून सकाळी ८. ३० वाजता सुटणारी सावंतवाडी - पुणे ही शिवशाही बस तब्बल दीड ते दोन तास सावंतवाडी बस स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर थांबून होती .चालक आणि वाहक या गाडीचा ताबा घेण्यास तयार नसल्यामुळे तब्बल दोन तास गाडीतच ताटकळत बसण्याची वेळ प्रवाशांवर आल्याने प्रवासी पुरते हैराण झाले होते. अखेर प्रवाशांचा पारा चढल्याने प्रवाशांनी तक्रार वहीत आपली तक्रार नोंद केली. चालकाला लांबच्या प्रवासाला जाणे सोयीचे वाटत नव्हते. त्यामुळे त्याने गाडीचा ताबा घेण्यास ना हरकत दर्शवली. त्याचा फटका मात्र प्रवाशांना सोसावा लागला. अखेर त्याच चालकाने नाविलाजास्त गाडीचा ताबा घेत १० वाजता गाडी बस स्थानकातून मार्गस्थ केली. उपस्थित प्रवाशांनी आगार व्यवस्थापक निलेश गावित यांच्याकडे कैफियत मांडताच सदरचालका विरोधात पंचनामा करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर तात्काळ चालक व वाहकाने गाडी मार्गस्थ केली. चालकाने स्पष्ट केले मी गेले काही महिने आपण लेखी तक्रार दिली आहे की मला लांबच्या प्रवासात एकट्याने जाणे शक्य नाही त्यामुळे अन्य कोणीतरी चालक गाडीसाठी द्या असे कळवले होते. त्यामुळे आपण आज गाडीचा ताबा घेतला नाही त्यात प्रवाशांना त्रास देण्याचा आपला हेतूच नव्हता असे चालकाने स्पष्ट केले.