For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोन भागात विभागली सुसाट ट्रेन

06:40 AM Aug 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
दोन भागात विभागली सुसाट ट्रेन
Advertisement

उत्तर प्रदेशात किसान एक्स्प्रेसला अपघात टळला : 80 च्या वेगाने धावत असताना घडला प्रकार

Advertisement

वृत्तसंस्था/ बिजनौर

उत्तर प्रदेशमधील बिजनौर जिल्ह्यात रविवारी धनबादला जाणाऱ्या प्रवासी रेल्वेचे काही डबे इंजिनपासून अलग झाल्यामुळे खळबळ उडाली. 80 किमी/तास वेगाने धावणारी किसान एक्स्प्रेस 25 ऑगस्ट रोजी बिजनौरमध्ये दोन भागात विभागली गेली. इंजिन 13 बोग्यांसह 4 किमी पुढे गेले. मात्र, 8 डबेच मागेच राहिल्याने बराच गोंधळ उडाला. या एक्स्प्रेसच्या डब्यात उत्तर प्रदेश पोलीस भरतीचे शेकडो उमेदवार आणि प्रवासी होते. रेल्वे पोलिसांनी सदर परीक्षार्थींना चार बसमधून बरेलीला पाठवले. सुदैवाने यादरम्यान दुसरी रेल्वे आली नसल्याने अपघात टळला. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Advertisement

मुरादाबादच्या पुढे सेओहरा आणि धामपूर स्थानकांदरम्यान रविवारी पहाटे 4 वाजता हा अपघात झाला. काही तांत्रिक बिघाडामुळे धनबादला जाणाऱ्या टेनच्या काही बोगी इंजिन आणि इतर बोगीपासून वेगळ्या झाल्या. त्यानंतर सेओहरा स्थानकावर एक्स्प्रेस थांबवण्यात आली, असे या प्रकरणाबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक (एएसपी) धरम सिंह मर्चल यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. सुदैवाने या घटनेमध्ये एकही प्रवासी जखमी झाला नसला तरी संबंधितांवर कारवाई होण्याचे संकेतही देण्यात आले आहे.

कपलिंग तुटल्याने घटना

किसान एक्स्प्रेस (13307) झारखंडमधील धनबादहून पंजाबमधील फिरोजपूरला जात होती. मुरादाबादच्या पुढे सेओहरा आणि धामपूर स्थानकांदरम्यान चक्रमल गावाजवळ ए3-ए4 डब्यांना जोडणाऱ्या बोगीचे कपलिंग तुटल्याने हा अपघात झाला. गार्डने चालक व अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. काही वेळाने रेल्वेचे पथक घटनास्थळी पोहोचले. 1 तासाच्या अथक परिश्र्रमानंतर हे डबे टेनला जोडण्यात आले. तांत्रिक बिघाडामुळे ए4 बोगी रद्द करून एक्स्प्रेस मार्गस्थ करण्यात आली.

पोलीस भरती परीक्षार्थींचा खोळंबा

सदर एक्स्प्रेसमध्ये उत्तर प्रदेश पोलीस भरती परीक्षेला जाणारे उमेदवार मोठ्या संख्येने प्रवास करत होते. अपघातानंतर रेल्वे पोलिसांनी तातडीने चार बसेस बोलावून उमेदवारांना बरेलीला पाठवले. अपघातामुळे या मार्गावरील रेल्वेसेवा काही तासासाठी विस्कळीत झाली होती. जननायक एक्स्प्रेस गाडी, हबीबवाला आणि पंजाब मेल धामपूर रेल्वेस्थानकावर दोन तास थांबवण्यात आल्याने प्रवाशांना तिष्ठत रहावे लागले.

प्रवासी झोपेत असताना गोंधळ

हा प्रकार घडला त्यावेळी बहुतांश प्रवासी झोपले होते. धावती एक्स्प्रेस दोन भागांमध्ये विभागली गेल्यानंतर प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांना शांत करत पर्यायी व्यवस्था करून दिली.

...अन्यथा मोठी जीवितहानी!

तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेचे दोन भाग झाले असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. किसान एक्स्प्रेस गाडीच्या पाठीमागून दुसरी गाडी न आल्याने मोठा अपघात टळला. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. या घटनेचा तपास रेल्वेने सुरू केला आहे. प्रवाशांनाही त्यांच्या सुरक्षितस्थळी पाठवण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.