बिहारमध्ये प्रवासी रेल्वेला अपघात
वृत्तसंस्था / पाटणा
नवी दिल्लीहून इस्लामपूरला जाणाऱ्या मगध एक्स्पे्रस ट्रेनचे मागचे डबे बिहारच्या बक्सर या शहरानजीक रेल्वेपासून निसटल्याने काहीकाळ प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाल्याची घटना घडली आहे. हा प्रकार रविवारी सकाळी घडला. तथापि, या अपघातात कोणीही जखमी झाले नाही, किंवा कोणतीही जीवित अगर मालमत्ता हानी झाली नाही, अशी माहिती रेल्वेच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
मगध एक्स्पे्रसचे मागचे काही डबे गाडी सुरु असताना अचानकपणे मूळ गाडीपासून अलग झाले. त्यामुळे रेल्वेचे मधोमध दोन तुकडे झाल्यासारखे दिसत होते, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. ही घटना बक्सर शहरानजीकच्या तुरीगंज आणि रघुनाथपूर या स्थानकांच्या मध्ये घडली. मगध एक्स्पे्रसचा अकराव्या क्रमांकाचा डबा पुढच्या डब्यापासून अलग झाला. त्यामुळे या डब्यासह त्याच्या मागचे 8 डबे गाडीपासून अलग झाले. गाडी 10 डब्यांसह पुढे निघून गेली आणि अलग झालेले डबे मागे राहिले. प्रवाशांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला. तसेच मागे राहिलेल्या डब्यांमधील प्रवाशांची भीतीने तारांबळ उडाली. तथापि, रेल्वेचालकाच्या आणि गार्डच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर इंजिन थांबविण्यात आले. त्यानंतर गाडीचे दोन भाग एकमेकांशी पुन्हा जोडण्यात आले आणि गाडी पुढच्या प्रवासाला लागली. तथापि, या घटनेमुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक साधारणत: दीड तास खोळंबलेली होती, अशी माहिती देण्यात आली.
चौकशीचा आदेश
चालत्या गाडीचे मागचे डबे मूळ गाडीपासून अलग कसे झाले, हा प्रश्न सध्या अनुत्तरित असून चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. चौकशीनंतर या घटनेच्या कारणाचा शोध लागणार आहे. मात्र, सुदैव म्हणून मोठा अपघात टळला. अलग झालेले डबे रुळावरुन घसरले असते तर हानी होऊ शकली असती. मात्र ते रुळावरुन न घसरल्याने कोणतीही हानी झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या गाडीत 800 हून अधिक प्रवासी होते, अशीही माहिती देण्यात आली आहे.