बेळगाव विमानतळावरील प्रवासी संख्या रोडावली
विमानफेऱ्या घटल्याचा परिणाम : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षही कारणीभूत
बेळगाव : बेळगाव विमानतळातून अनेक सेवा बंद झाल्याने याचा परिणाम प्रवासी संख्येवरून दिसून येत आहे. फेब्रुवारी महिन्यात 26 हजार 717 प्रवाशांनी विमान प्रवास केल्याची नोंद विमानतळ प्राधिकरणाकडे आहे. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात 29 हजार 530 प्रवाशांनी विमान प्रवास केला होता. विमानफेऱ्या कमी झाल्यामुळे प्रवासीही कमी होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. देशातील एक जुने विमानतळ म्हणून बेळगाव विमानतळाकडे पाहिले जाते. बेळगावमधून देशातील महत्त्वाच्या शहरांना विमानफेऱ्या सुरू होत्या. परंतु, उडान योजनेचा कालावधी संपल्याने यातील बऱ्याचशा सेवा विमान कंपन्यांनी बंद केल्या. नागरिकांचा प्रतिसाद असतानाही काही विमानफेऱ्या बंद करण्यात आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला होता.
विशेषत: चेन्नई, मुंबई, पुणे, तिरुपती या शहरांना उत्तम प्रतिसाद असतानाही या सेवा इतर शहरांना जोडण्यात आल्या. फेब्रुवारी महिन्यात 26 हजार 717 प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे. 376 विमानांची बेळगावमध्ये ये-जा होती. तर एक मेट्रिक टन मालाची वाहतूक करण्यात आली आहे. मागील काही महिन्यांचा आढावा घेतल्यास प्रवासी संख्या कमी होताना दिसत आहे. केवळ बेंगळूर, हैद्राबाद व दिल्ली वगळता इतर शहरांना दैनंदिन विमाने उपलब्ध नाहीत. त्यातही काही विमाने वरचेवर रद्द होत असल्याने प्रवासी बेळगावपेक्षा जवळील मोपा विमानतळाला पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विमानतळावरील अजून काही सेवा बंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
‘हुबळी’ची कामगिरी उंचावली
हुबळी-धारवाड यासारखी मोठी महानगरे असतानाही बेळगाव विमानतळाने त्यांच्यापेक्षाही मोठी प्रवासी संख्या नोंदवली होती. मागील अनेक वर्षांत राज्यात तिसऱ्या स्थानी बेळगाव विमानतळाची नोंद होत होती. परंतु, आता मात्र हुबळी विमानतळ बेंगळूर व मंगळूरनंतर तिसऱ्या स्थानी पोहोचले आहे. फेब्रुवारी महिन्यात हुबळी विमानतळातून 29 हजार 928 प्रवाशांनी विमान प्रवास केल्याची नोंद आहे. केवळ लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे विमानफेऱ्या कमी होत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे.