धावजी धक्क्यावर प्रवासी फेरीबोट भरकटली
प्रवासी, कर्मचाऱ्यांची उडाली घाबरगुंडी : कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून नांगर टाकल्याने धोका टळला
कुंभारजुवे : चोडण येथील जेटीवर नांगरून ठेवलेली फेरीबोट बुडाल्याची ही गोष्ट ताजी असताना बुधवारी 25 रोजी सकाळी 10 वा. टोलटो फेरी धक्क्मयावरून ‘मार्मागोवा’ ही फेरीबोट घेऊन सुटली आणि धावजी येथे फेरीधक्क्यावर लावताना फेरीबोटीचे इंजिन बंद पडले. त्यामुळे कुंभारजुवेच्या बाजूने फेरीबोट प्रवाहाबरोबर वाहत जाऊन भरकटली. अचानक हा प्रकार घडल्याने फेरीबोटीतील कर्मचारी व दुचाकीसह असलेल्या वाहनचालकांची घाबरगुंडी उडाली. कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत नांगर टाकला. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. दरम्यान, त्याचवेळी खनिज वाहतूक करणारी एक बार्ज मांडवी नदीतून वास्को येथे जात होती. ते पाहून किनाऱ्यावर असलेल्या लोकांनी आरडाओरड करून बार्जला थांब्विण्याची सूचना केली. परंतु भरतीचा प्रवाह जोरदार असल्याने बार्ज उभी करणे शक्य नव्हते तरी त्यातील सुकाणूने कशीबशी बार्ज बाजूला घेतली. बाजूला घेताना किनाऱ्याला लागून असलेली झाडे मोडत अगदी जवळून सदर फेरीबोटीला धक्का न लागता बार्ज पुढे सरकली.
सुदैवाने फेरीबोटीतील कर्मचारी व प्रवाशांवर आलेले संकट सुदैवाने टळले त्यामुळे त्यांनी सुटकेचा सुस्कारा सोडला. यावेळी एक झाडही धक्का बसून बार्जीत पडले. बुधवार 25 जून रोजी सकाळी 10 वाजता फेरीबोट टोलटो धक्क्यावरून धावजी येथे जाताना ही घटना घडली. फेरीबोट कर्मचाऱ्यांनी या घटनेची कल्पना नदी परिवहन खात्याला दिली. फेरीबोटीत बिघाड झाल्याने दुसऱ्या फेरीबोटीसाठी सुमारे अर्धा तास प्रतीक्षा करावी लागली. जुने गोवे येथून दुसरी फेरीबोट घटनास्थळी आल्यानंतर त्या नांगरून ठेवलेली फेरीबोट धक्क्याला लावली व त्यातील वाहनचालक कर्मचारी प्रवासी अखेर सुखरूप बाहेर पडले. बंद पडलेली फेरीबोट संध्याकाळी 4 वा दुऊस्त करून कार्यरत केली. तोपर्यंत दुसऱ्या फेरीबोटीद्वारे प्रवाशांना सेवा देण्यात आली. वास्तविक ‘मार्मागोवा’ फेरीबोटीचे इंजिन खूप जुने असून वारंवार या फेरीबोटीत बिघाड होत असतो. यासंबंधी फेरीबोटीच्या कर्मचाऱ्यांनी याची कल्पना नदी परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांना देऊन त्याजागी अन्य फेरीबोट द्यावी, अशी मागणी केली होती. परंतु या फेरीबोट मार्गाचे खासगीकरण झाल्याने याठिकाणी नदी परिवहन खात्याचे अधिकारी त्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असतात, ही वस्तुस्थिती आहे
सुस्थितीत असलेली फेरीबोट द्यावी!
सध्या पावसाळ्यात कुंभारजुवे खाडीतून खजिनवाहू बार्जेस ये-जा करतात. त्यामुळे या मार्गावर सुस्थितीत असलेली प्रवासी फेरीबोट असणे आवश्यक आहे. अन्यथा प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. भविष्यात काही विपरीत घडण्यापूर्वी या जलमार्गावर चांगली फेरीबोट आणावी तसेच फेरीबोटीवर अनुभवी कर्मचारी नेमावे, अशी प्रवासी व नागरिकांची आग्रही मागणी आहे.