गोवा भू‐संवर्धन विधेयक अधिवेशनात संमत करा
माजी न्या. फेर्दिन रिबेलो यांची मागणी, पणजीत ‘इनफ इज इनफ’च्या कार्यालयाचे उद्घाटन, जमीन रुपांतरे रद्द करा
पणजी : नगर नियोजन कायदा 39 ए अंतर्गत झालेली सर्व आणि प्रस्तावित जमीन रुपांतरे रद्द करुन फोंडा पोटनिवडणुकीनंतर पुन्हा विधानसभा अधिवेशन बोलवावे तसेच 39 (ए) कलम रद्द करण्याची मागणी असणारे गोवा भू-संवर्धन विधेयक त्यात संमत करावे, असे माजी न्या. फेर्दिन रिबेलो यांनी म्हटले आहे. रिबेलो यांनी सुरु केलेल्या ‘इनफ इज इनफ“ या लोक चळवळीचे पणजीत कार्यालय सुरु झाले असून त्यावेळी बोलताना न्या. रिबेलो यांनी वरील मागण्या केल्या. त्यांनी सांगितले की, ही चळवळ राजकीय नाही तर ती गोव्याची भूमी जतन करण्यासाठी आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आपल्या मतदारसंघातील 39-ए कलम लावलेली जमीन रुपांतरे रद्द करतात मग इतर मतदारसंघातील व तालुक्यातील का करत नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अधिवेशन पुन्हा बोलवा
रिबेलो म्हणाले की, आपण तयार केलेले विधेयक विरोधी पक्षनेत्यांनी विधानसभेत मांडण्यासाठी प्रयत्न केले तथापि सरकारला विधानसभेत त्यावर चर्चाच करायची नव्हती म्हणून फोंडा पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेचे निमित्त करुन सरकारने विधानसभा अधिवेशनच गुंडाळले. ते परत बोलवावे आणि त्यात 39 (ए) कलम रद्द करणारे विधेयक संमत करावे, असे त्यांनी सूचवले आहे.
हा मोठा घोटाळा
कृषी जमिनींचे रुपांतर करता येत नाही तरीदेखील त्यांचे रुपांतर करण्यासाठी झोन बदलाची दुरुस्ती नगरनियोजन कायद्यात झाली हा मोठा घोटाळा असल्याचा दावा रिबेलो यांनी केला आहे.
कार्यालयात येऊन लोक तक्रारी देऊ शकतात
ही लोक चळवळ कोणाचेही सरकार येवो / जावो चालूच राहणार असून पणजी येथील व्हेलो बिल्डिंगमध्ये (पणजी चर्चजवळ) सुरु करण्यात आलेल्या कार्यालयात लोक येऊन तक्रारी देऊ शकतात, असे रिबेलो यांनी नमूद केले.
चळवळीस जनतेचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा
कार्यालयाच्या शुभारंभावेळी टी.बी. कुन्हा, जॅक सिकेरा व पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. ते तिघेजण गोव्याचे रक्षणकर्ते होते याची त्यांनी आठवण करुन दिली. ही चळवळ वॉचडॉग म्हणून काम करणार असून जनतेचा या चळवळीस मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे रिबेलो यांनी सांगितले.