पर्वरीचा उड्डाणपूल ठरणार रेकॉर्ड ब्रेक!
अवघ्या चार महिन्यांत बरेचसे काम पूर्ण : अत्त्याधुनिक यंत्रणेसह युद्धपातळीवर काम, दर्जा राखण्याबरोबरच संकटांशीही सामना
पणजी : पर्वरी येथे सध्या उभारण्यात येत असलेला पाच पूर्णांक पाच किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल रेकॉर्ड ब्रेक तर ठरणारच आहे, शिवाय तो आतापर्यंतचा गोव्यातील झुवारी नंतरचा सर्वात महत्त्वाचा व अत्यंत दर्जेदार पूल ठरणार आहे. अवघ्या चार महिन्यात या पुलाचे बरेचसे काम रेकॉर्ड ब्रेक पूर्ण झालेले आहे. पर्वरी येथील वाहतूक ही अत्यंत डोकेदुखी बनलेली आहे. म्हापसा ते पणजी यादरम्यान पर्वरी शेतीपर्यंतचा सहा पदरी रस्ता तयार आहे. मात्र मांडवी पुलापर्यंत जाण्यासाठी पुढे बऱ्याच प्रमाणात रस्ता हा ‘बॉटल नेक’ बनलेला आहे. गेली कित्येक वर्षे या रस्त्यावर अत्यंत धिम्या गतीने वाहतूक होत होती. दररोज म्हापसा ते पणजी या केवळ 13 किलोमीटरच्या अंतरासाठी किमान एक तासपेक्षा जास्त वेळ लागत असे. भरगच्च वाहने आणि दुतर्फा झालेल्या अनेक इमारती तसेच मोठ्या प्रमाणात पार्किंग आणि असंख्य सरकारी कार्यालयांचा भरणा. यामुळे पर्वरी येथील वाहतूक व्यवस्था नेहमीच कोलमडलेली असायची. यावर एकमेव उपाय म्हणून रस्ता ऊंदीकरणाचे काम हाती घेतले मात्र रस्ता ऊंदीकरणासाठी मिळालेली अतिरिक्त जागाही अपुरी पडत होती. यामुळे या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय नव्हता.
केंद्र सरकारची भक्कम आर्थिक मदत
केंद्र सरकारने अर्थात केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी या उड्डाणपुलासाठी सारी मदत केंद्र सरकारतर्फे दिली जाईल असे घोषित केले आणि त्यानंतर सर्वेक्षण झाले आणि प्रत्यक्षात निविदा जारी केल्या आणि त्यात राजस्थानच्या आरआरएसएम या कंपनीला कंत्राट देण्यात आले. केवळ 376 कोटी रुपयांमध्ये हा अत्त्याधुनिक पूल उभारला जात आहे.
रोज 19 अभियंते करतात दर्जा तपासणी
या पुलाचे बांधकाम करणाऱ्या आरआरएसएम कंपनीचे व्हाईस चेअरमन राजदीप भट्टाचार्य हे स्वत: रोज या बांधकामावर नजर ठेवून असतात. महत्वाचे म्हणजे रोज होणाऱ्या बांधकामाचा दर्जा तपासण्याचे काम रोज केले जाते. त्यासाठी केंद्र सरकाने ‘लायन’ नावाच्या कंपनीची नियुक्ती केली आहे. या कंपनीचे तब्बल 19 अभियंते दर्जा तपासणीचे काम दररोज करत असतात. बांधकाम योग्य प्रकारे झाल्याचे प्रमाणपत्र त्यांच्याकडून मिळाल्यांनतर पुढील काम सुरु होते.
मुख्यमंत्री, पर्यटनमंत्र्यांचे चांगले सहकार्य
सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंता दिनेश तारे यांनी सांगितले की मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या महत्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यासाठी खूप सहकार्य दिले आहे. तसेच स्थानिक आमदार तथा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनीही खूप मदत केली. उभ्या राहणाऱ्या समस्या त्यांनी सोडविल्या. लोक सराकारी जागेतसुद्धा अम्हाला अडथळे आणत होते, कुंपणावरुन भांडणे करत होते, काहीजण रोज बांधकामाच्या ठिकाणी येऊन शिव्या घालायचे, मात्र पर्यटनमंत्र्यांनी यात लक्ष घालून आमच्यासमोरील या समस्या सोडविल्या.
केवळ चार महिन्यांत 86 पैकी 66 खांबांचे काम पूर्ण
सप्टेंबर 2024 मध्ये या पुलाचे बांधकाम सुरु झाले होते. आता फेब्रुवारीचा पहिला आठवडा सुरु आहे. चार महिन्यानंतर जवळपास एकूण 86 पैकी 66 खांबांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सदर कंत्राटदार कंपनी कोणत्याही बाबतीत तडजोड करीत नाही. म्हणूनच बांधकामाचा दर्जा राखून ही मंडळी दिवस-रात्र बांधकाम करीत आहे. गोव्यात आतापर्यंत अनेक पूल उभारण्यात आले. मात्र पर्वरीचा हा उड्डाणपूल अनेक संकटांना तोंड देत अवघ्या रेकॉर्डमध्ये पूर्ण होण्याच्या तयारीत आहे.
अनेक संकटांचा सामना
हे काम त्यांनी हाती घेतले खरे परंतु त्यांच्यासमोर अनेक संकटे उभी राहिली. अनेकजण त्यांच्या या बांधकामांना आक्षेप घेत राहिले. अनेकजण न्यायालयात देखील गेले. हे सर्व हाताळताना सदर कंत्राटदार कंपनीला नाकीनऊ आले. सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता ज्युडो कार्व्हालो आणि सहाय्यक अभियंता दिनेश तारे हे दोन अधिकारी गोवा सरकारने या उड्डाणपुलासाठी नियुक्त केले आहे. दररोज नव्यानव्या संकटांना हे अधिकारी तोंड देत होते. परंतु कोणत्याही परिस्थितीत हे बांधकाम सुरू करायचेच असे त्यांनी ठरवले आणि सप्टेंबरमध्ये प्रत्यक्षात बांधकाम सुरू केले.
दोन खांबांवर चढल्या कमानी
यापूर्वी अनेक रस्त्यांचे व पुलांचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी चार चार वर्षे किमान लागत असे. आज अवघ्या चार महिन्यात 66 खांबांचे बांधकाम पूर्ण देखील झाले आहे. त्यातील दोन खांबांवर कमानी देखील चढवण्यात आल्या आहेत. उर्वरित 20 खांबांचे बांधकाम चालू असून त्यातील काही खांबांचे बांधकाम हे पुढील महिन्यात पूर्ण होईल. सदर कंपनीला एप्रिल 2026 पर्यंतची मुदत असून या कंत्राटदाराने 26 जानेवारी 2026पर्यंत पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवलेले आहे. हे बांधकाम करताना अनेक ठिकाणी वाहतूक वळवावी लागते. त्यामुळे येणऱ्या जाणाऱ्या अनेक वाहनधारकांकडून शिव्याही खाव्या लागतात.
मात्र कोणत्याही परिस्थितीत हे बांधकाम नियोजित वेळेपेक्षा अगोदर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट जसे कंत्राटदाराने ठरविले आहे तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी देखील ठरविले आहे. पर्वरीतील प्रचंड वाहतूक कोंडी, हजारो वाहने अडकलेली असतात. त्याच्या मधोमध हे खांब उभारणे सुरु आहे. त्यासाठी विविध प्रकारची यंत्रणा आणणे हे सर्व प्रकार म्हणजे अक्षरश: तारेवरची कसरत असते. अशाही परिस्थितीत अनेक संकटांना सामोरे जात पर्वरीचा उड्डाणपूल दिमाखात उभा राहत आहे. आपुल उभारणे हेच मोठे एक आव्हान आणि फार मोठे आश्चर्य देखील ठरणार आहे. हे बांधकाम करताना पुलासाठी गडगंज पद्धतीचे लोखंड वापरले जाते. त्याचा दर्जा आणि खांब उभारण्यासाठी वापरण्यात येणारे काँक्रेट यांची देखील दररोजच्या दररोज तपासणी केली जाते. दर्जामध्ये कुठेही तडजोड केली जात नाही हे त्याचे वैशिष्ट्या आहे. आश्चर्याची बाब म्हणजे एवढा मोठा हा प्रकल्प मात्र सदर कंपनी केवळ ऊपये 376 कोटी मध्ये उभारीत आहे.