For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कार्यकर्ते ही भाजपची खरी ताकद

01:08 PM Jan 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
कार्यकर्ते ही भाजपची खरी ताकद
Advertisement

भाजपाध्यक्ष नितीन नबीन यांचे प्रतिपादन : गोव्यात कार्यकर्त्यांच्या सक्रियतेचे कोडकौतुक

Advertisement

पणजी : कार्यकर्ते हेच भाजपाची खरी ताकद असते आणि गोव्याने ते सिद्ध करूनही दाखविले आहे. म्हणूनच गोव्यात भाजप संघटना मजबूत आहे, अशा शब्दांत गोव्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या सक्रियतेची प्रशंसा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी केली. कार्यकर्त्यांच्या बळावरच जनतेशी सतत संपर्क ठेवणे, तसेच सरकारच्या योजना अंत्योदय घटकापर्यंत पोहोचविणे आणि संघटनात्मक शिस्त अधिक बळकट करणे शक्य होत असते. हेच तत्त्व कायम पाळताना प्रत्येक पातळीवर समन्वयाने काम करा, असा संदेशही नबीन यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना दिला. दोन दिवसांच्या गोवा भेटीवर आलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचे शुक्रवारी जोरदार आतषबाजी, ढोल ताशांचा गजर आणि कार्यकर्त्यांच्या अमाप उत्साहात जल्लोषी स्वागत करण्यात आले. राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांची ही पहिलीच गोवा भेट आहे.

सकाळी 11 वाजता नबीन यांचे मोप विमानतळावर आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी त्यांचे स्वागत केले. तेथून ते थेट पणजी येथील भाजप मुख्यालयात आले. त्यावेळी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद तानावडे, मंत्री बाबूश मोन्सेरात, रमेश तवडकर, आमदार ऊडाल्फ फर्नांडिस, माजी उपमुख्यमंत्री बाबु कवळेकर, यांच्यासह विविध पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत ढोल, ताश्यांच्या गजरात जोरदार घोषणा देत पुष्पवर्षाव करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांकडून पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. परिसरात फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.

Advertisement

त्यानंतर लगेचच नबीन यांनी स्थानिक गाभा समितीची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. त्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी, बूथ स्तरीय कामकाज, कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण यांच्यासह सध्याची राजकीय स्थिती, तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी यासारख्या विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीस मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांच्यासह राष्ट्रीय महामंत्री तऊण चुग यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सरकारकडून सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा सादर केला. आरोग्य सेवा, शिक्षण, पर्यटन आणि रोजगारनिर्मिती या क्षेत्रांत राबविण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा आणि अन्य योजनांमुळे विकासाला गती मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. तरुण चुग यांनी मार्गदर्शन करताना, केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांबद्दल माहिती दिली व त्या योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी एकसंधपणे काम करण्याचे आवाहन केले. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, बाबूश मोन्सेरात यांनीही यावेळी विचार मांडले.

आज ताळगावात मेळावा

नबीन यांच्या गोवा भेटीचे औचित्य साधून भाजपने आज शनिवार दि. 31 रोजी सकाळी 10 वा. ताळगांव कम्युनिटी हॉलमध्ये भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर ते मिरामार येथील भाऊसाहेब बांदोडकर व मनोहर पर्रीकर यांच्या स्मृतिस्थळांना भेट देणार आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली.

नोकऱ्यांबाबत मंत्री, आमदारांनी मांडली कैफियत

प्राप्त माहितीनुसार आमदारांच्या बैठकीत कर्मचारी निवड आयोगाच्या माध्यमातून सरकारी नोकऱ्या देण्याच्या पद्धतीला काही मंत्री व आमदारांनी आक्षेप घेतल्याचे समजले आहे. त्यासंबंधी त्यांनी नबीन यांच्याकडे कैफियत मांडली व या आयोगाच्या माध्यमातून ठराविक मतदारसंघातील उमेदवारांनाच नोकरी मिळते. त्यामुळे आमच्या मतदारसंघातील लोकांना न्याय निळत नाही. याचे परिणाम आम्हाला 2027 च्या विधानसभा निवडणुकीवेळी भोगावे लागणार असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

Advertisement
Tags :

.