For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पक्षाचे विलिनीकरण की कुटुंबाचे विभाजन?

06:37 AM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
पक्षाचे विलिनीकरण की कुटुंबाचे विभाजन
Advertisement

राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे विलिनीकरण करण्याच्या चर्चा होत असतानाच अजित पवार गटाच्या नेत्यांनी आपले राजकीय वजन सत्ताधाऱ्यांच्या पारड्यात टाकले आहे. त्यामुळे दोन गटांच्या विलीनीकरणाला आता आणखी खीळ बसली आहे. अजित पवारांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतरही पक्षात फुट पडली मात्र कुटुंबात फुट पडणार नाही याची काळजी दादांनी घेतली. आता दादांच्या निधनानंतर झालेल्या राजकीय घडामोडी बघता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटात बिनसले असून हे गट यापुढे एकत्र येतील की नाही याविषयीच शंका व्यक्त होत आहे.

Advertisement

मस्त रहा आयुष्य नीट जगा, राजकारण लय वंगाळ असतं असे जाहिरसभेत बोलणाऱ्या अजित पवारांच्या विधानाचा प्रत्यय त्यांच्या निधनानंतर सुरू झालेल्या संवेदनाहीन राजकारणातून येताना दिसत आहे. अजित पवारांना जाऊन अजुन दहा दिवस झाले नाहीत, तोवर राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चेने सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोप, हेव्या-दाव्याने महाराष्ट्रातील राजकारण खरोखरच उद्वेगजनक असल्याची सामान्यांची भावना झाली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी पक्षाच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवड झाली. उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा वहिनींनी शपथदेखील घेतली, मात्र हे सगळ होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गट पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली होती. महापालिका निवडणुकीदरम्यानच विलीनीकरणाबाबत आधीपासूनच कुजबुज सुरू होती, 12 फेब्रुवारीला या दोन्ही गटाचे विलीकरण होणार असे दादा आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत नक्की झाल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे विलीनीकरणाचे समर्थन करणारे तर दुसरीकडे विरोध करणारे असे राजकारण सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या वादात उडी घेत, असा निर्णय घेण्यापूर्वी आपल्याला दादांनी तसे सांगितले असते अशी प्रतिक्रिया दिली आहे. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनिल तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. शरद पवारांच्या मूळ राष्ट्रवादी पक्षावर अजित पवारांनी दावा केला, अजित पवार हे शरद पवारांचे पुतणे, राज्याच्या राजकारणातील  शरद पवारांचा उत्तराधिकारी म्हणून अजित पवारांकडे बघितले जात होते. म्हणून अजित पवारांनी पक्षावर दावा केला, भाजपसोबत सत्तेत गेले ठिक, मात्र आता अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवारांचा पक्ष तटकरे आणि पटेल स्वत:च्या स्वार्थासाठी भाजपच्या दावणीला बांधत असल्याचा आरोप विरोधीपक्षाच्या नेत्यांनी केला आहे. शरद पवारांच्या मूळ पक्षावर दादांनी दावा केला त्यांना तो अधिकार होता. पण दादांच्या नंतर हा पक्ष पवारांचा असावा, त्या पक्षाचा वापर इतरांनी कोणी कऊ नये, अशी भावना शरद पवार गटाची आहे. दादांचा तेरावा विधी झाल्यानंतर याबाबत पवार कुटुंबातील व्यक्तींबरोबरच काही महत्त्वाच्या नेत्यांकडून मोठे गौफ्यस्फोट होण्याची शक्यता आहे.

जिथे सर्वसामान्य माणसाची विचार करण्याची क्षमता संपते, त्याच्यापुढेच राजकारण सुरू होते. जेवढा माणूस मोठा तेवढे त्याच्या मृत्युनंतर राजकारण होताना दिसते. दादांच्या मृत्युनंतर आता हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दादांच्या गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या निमित्ताने काही सवाल उपस्थित केले आहेत. एक अपघात की घातपात आणि दुसरा विलीनीकरणाच्या चर्चेवऊन राजकारण या दोन मुद्यावर सध्या महाराष्ट्राचे राजकारण सुरू आहे. रविवारी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला, देशाला सवार्धिक कर महाराष्ट्र आणि मुंबईतून मिळतो. कालच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काय मिळाले, यापेक्षा राष्ट्रवादीचे विलीनीकरण आणि आरोप प्रत्यारोपाचीच चर्चा जोरात रंगली होती. त्यात भर घातली ती पियुष गोयल यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी प्रफुल पटेल यांची निवड झाल्याच्या चुकीचे विधान कऊन, राष्ट्रवादीची दोन शकले झाल्यानंतरही शरद पवार आणि अजित पवार यांच्यात फुट पडलेली नव्हती, काका-पुतणे हे अनेक कार्यक्रमाला एकत्र येत असत. अजित पवारांनी सुरूवातीला काही दिवस शरद पवारांना टाळले. परंतु लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंकडून झालेला पराभव, त्या पराभवानंतर स्वत: दादांनी सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवारांना उभे नव्हते करायला पाहिजे होते, असे वक्तव्य केले. इतकेच नाही तर विधानसभेला शरद पवार गटाने युगेंद्र पवारांना दादांच्या विरोधात उमेदवारी दिल्यानंतर, मी केलेली चुक पवार साहेबांनी करायला नको होती, असे दादांनी सांगताना घरातील भांडण चव्हाट्यावर आणायची नाहीत, आपलं घर सांधायला दुसरं कोणी येणार नसल्याचे जाहिरपणे वक्तव्य केले होते. अजित दादांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर कुटुंबातील निर्माण झालेली कटुता कमी करण्याचा प्रयत्न केला. तो शेवटपर्यंत, पवार साहेबांच्या हयातीत राष्ट्रवादीचे विलिनीकरण करण्याची त्यांची इच्छा होती आणि त्याच अनुषंगाने चर्चा झाल्याचा दावा शरद पवार गटाकडून केला जात आहे. जयंत पाटील शशिकांत शिंदे, सुप्रिया सुळे, रोहीत पवार यांच्यासह शरद पवार आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीचा व्हिडीओदेखील शरद पवार गटाकडून व्हायरल करण्यात आला आहे. तर ही चर्चा केवळ निवडणुकीच्या युतीपुरती झाल्याचे तटकरे यांनी सांगत विलीनीकरणाच्या चर्चेचे खंडन केले, शरद पवारांनी मात्र जे चर्चेला हजरच नव्हते त्यांना बोलण्याचा अधिकार नसल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तटकरे आणि पटेल यांच्यासह अनेकांना सुनावले. अजित दादांच्या जाण्याने राज्याची मोठी हानी झाली आहे. पण काही राज्यकर्त्यांना अजित पवारांच्या निधनापेक्षा विलीनीकरणाचा मुद्दा महत्त्वाचा वाटतो, कारण त्यावर अनेकांचे भविष्यातील राजकारण अवलंबून आहे. आगामी काळात हा मुद्दा इतका महत्त्वाचा करण्यात येईल की, जे विलीनीकरणाच्या चर्चेला हजर होते त्यांची नार्कोटेस्ट करा अशी मागणीदेखील केली जाऊ शकते. अजितदादांचे अचानक जाणे क्लेषदायक होते. मात्र त्यांच्या जाण्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीमध्येच जर संघर्ष निर्माण होत असेल तर हे खूप दुर्देवी आहे.

Advertisement

प्रवीण काळे

Advertisement
Tags :

.