टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये 60 हजार धावपटूंचा सहभाग
वृत्तसंस्था /मुंबई
येथे रविवार दि. 18 जानेवारी रोजी होणाऱ्या 21 व्या टाटा पुरस्कृत मुंबई मॅरेथॉनमध्ये किमान 60 हजार धावपटू सहभागी होणार असल्याचे स्पर्धा आयोजकांनी सांगितले.
टाटा पुरस्कृत मुंबई मॅरेथॉन ही विश्व अॅथलेटिक्स गोल्ड लेबल रेस म्हणून ओळखली जाते. आतापर्यंत या स्पर्धेत 69100 स्पर्धकांनी आपली नावे नोंदविली असून स्पर्धकांच्या बाबतीत हा एक नवा विक्रम आहे. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच यावेळी फुलमॅरेथॉनमध्ये विक्रमी 14059 धावपटू सहभागी होत आहेत. सदर स्पर्धा हाफ मॅरेथॉन आणि खुल्या 10 कि.मी. पल्ल्याची अशा दोन विभागात घेतली जाणार आहे.
गेल्या दोन दशकांपासून मुंबईत ही मॅरेथॉन प्रत्येक वर्षी नियमीतपणे यशस्वी केली जाते. या मॅरेथॉनमुळे जनतेला शारीरिक आरोग्याचा सल्ला मिळतो. मुंबई मॅरेथॉनमुळे विमान वाहतूक, हॉटेल्स तसेच स्थानिक व्यापाऱ्यांना चांगलाच आर्थिक फायदा मिळतो. गेल्या वर्षी या स्पर्धेसाठी आयोजकांनी 53.62 कोटी रुपयांचा निधी जमा केला होता. त्यापैकी शैक्षणिक क्षेत्रासाठी 27.66 कोटी रुपये खर्च करण्यात आले.