पार्था दयाळूपणा दाखवल्यामुळे तुझी सुटका होणार नाही
अध्याय दुसरा
भगवंत म्हणाले, अर्जुना, आत्मा प्रत्येकाचे मूळ स्वरूप असून तो कधीच नष्ट होत नाही. हे आत्मस्वरूप जाणून घेण्यासाठीच मनुष्यजन्म आहे. हे आत्मरूपी चैतन्य विश्वामध्ये सर्वत्र भरलेले असून ते अमर आहे. हे जग परमेश्वराच्या मर्जीने उत्पन्न होते आणि नाहीसे होते, म्हणून नातेवाईकांचे देह तुझ्या हातून नाहीसे होतील ह्या कल्पनेने तू शोक करू नकोस. स्वधर्माच्या दृष्टीने विचार केलास, तर तुला कळेल की, युद्धातून पळ काढण्यापेक्षा युद्ध करणेच योग्य आहे. स्वधर्माचे आचरण केले असता कोणताही दोष न लागता सर्व इच्छा सहजच पूर्ण होतात. हा संग्राम टाकून भलत्याच गोष्टींचा शोक करत बसलास तर तूझ्या पूर्वजांनी मिळविलेली पुण्यकीर्ति धुळीला मिळेल. सगळे जग तुझी निंदा करेल, ह्या अर्थाचा अखंड लोक गातील दुष्कीर्ति जगती तुझी । मानवंतास दुष्कीर्ति मरणाहूनि आगळी।। 34 ।।
हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. भगवंत म्हणाले, पार्था ! तुझ्या या दयाळूपणामुळे तुझी सुटका होणार नाही आणि जरी मोठ्या कष्टाने कदाचित तुझी या प्राणसंकटातून सुटका झालीच, तरी ते जगणे मरणापेक्षा भयंकर असेल. तू आणखी एक गोष्टीचा विचार कर. तू या ठिकाणी मोठ्या उत्साहाने लढण्यासाठी आलास आणि जर दया उत्पन्न झाल्याने परत माघारी फिरलास तर तुझे दयाळूपण, या दुष्ट वैऱ्यांना न समजल्याने ते तुला चोहोबाजुंनी घेरतील व तुझ्यावर बाणांचा वर्षाव करतील. पार्था! तुझा ह्या दयाळूपणामुळे तुझी सुटका होणार नाही.
पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, तू जर युद्धातून पळ काढलास तर हे सर्व महारथी, रणांगणातून तू घाबरून पळून गेलास असे मानतील. आजपर्यंत तुझे शौर्य मान्य असलेले तुला तुच्छ मानतील.
भिऊनि टाळिले युद्ध मानितील महा-रथी । असूनि मान्य तू ह्यास तुच्छता पावशील की ।। 35 ।।
श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंत अर्जुनाला युद्धासाठी जमलेले महारथी त्याच्याबद्दल काय मत करून घेतील ते सांगताना म्हणाले, अर्जुन आम्हाला भिऊन युद्ध सोडून पळून गेला असा ठपका ते तुझ्यावर ठेवतील. ते चांगले आहे का? स्वत:ची कीर्ती वाढवण्यासाठी लोक अनेक प्रकारचे कष्ट करतात किंवा प्रसंगी आपला प्राणही गमावतात. ती कीर्ती तुला अनायासे लाभलेली आहे. आकाश हे ज्याप्रमाणे अमर्याद आहे त्याप्रमाणे अमर्याद व उपमारहित अशी तुझी किर्ती आहे. त्रैलोक्यात तुझ्या गुणांची प्रसिद्धी आहे. दाही दिशांचे राजेरजवाडे, तुझ्या गुणांचे वर्णन करतात. ती ऐकून यमादिक देखिल दचकतात. अशी तुझी किर्ती गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ व पवित्र आहे. ती पाहून, ऐकून जगातील मी मी म्हणणारे योद्धे पण चकित होतात. तुझ्या कीर्तीचे महात्म्य ऐकून आपणही तशी कीर्ती मिळवावी अशी प्रेरणा अनेकांना मिळते. तुझ्या अपूर्व शौर्याचा महिमा ऐकून, सर्व कौरवांनी आपल्या जीविताची आशा सोडली आहे. ज्याप्रमाणे सिंहाची गर्जना ऐकून उन्मत्त हत्तीलाही प्रलयकाळ जवळ आला आहे असे वाटते त्याप्रमाणे या कौरवांनी तुझी धास्ती घेतली आहे. ज्याप्रमाणे पर्वत वज्राला किंवा सर्प गरूडाला घाबरतो, त्याप्रमाणे हे कौरव सैन्य तुला घाबरते. असे असून सुद्धा जर तू युद्ध न करता माघारी फिरशील तर मिळवलेली, दिगंत किर्ती नाहीशी होऊन तुला कमीपणा येईल. म्हणून तू जर युद्धातून पलायन करशील तर तू मिळवलेली, किर्ती नाहीशी होऊन तुझी सर्वत्र छी थू होईल.
क्रमश: