चांद्रयान-3 च्या रॉकेटचा काही भाग नियंत्रणाबाहेर
पृथ्वीच्या वातावरणात येत प्रशांत महासागरात कोसळला
वृत्तसंस्था /बेंगळूर
चांद्रयान-3 च्या प्रक्षेपण वाहन ‘एलव्हीएम3 एम4’ चा एक भाग नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा परतला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने यासंबंधी माहिती दिली. नियंत्रणाबाहेर आलेला भाग प्रक्षेपण वाहनाचा क्रायोजेनिक वरचा टप्पा होता. बुधवार, 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:42 वाजता या भागाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. त्यानंतर हा भाग प्रशांत महासागरात कोसळला. ते नियंत्रणाबाहेर जाण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चांद्रयान-3 मोहिमेतील रॉकेटच्या भागाने 124 दिवसांनी पृथ्वीवर पुन्हा प्रवेश केला. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने 14 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथून ‘एलव्हीएम3 एम4’ रॉकेट वापरून तिसरी चंद्रमोहीम यशस्वीरित्या प्रक्षेपित केली होती. त्याचे सॉफ्ट लँडिंग 23 ऑगस्ट रोजी झाले होते.