For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मडगावात जीर्ण इमारतीचा भाग कोसळला

12:45 PM May 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
मडगावात जीर्ण इमारतीचा भाग कोसळला
Advertisement

पिंपळकट्ट्यानजीकच्या परिसरात घडलेली घटना, तीन गाड्यांचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली, कारमध्ये असलेले लहान मूलही बचावले

Advertisement

मडगाव : मडगावातील गजबजलेल्या पिंपळकट्ट्यानजीकच्या परिसरातील रस्त्यानजीकच्या एका इमारतीचा भाग शुक्रवारी दुपारी कोसळला. या दुर्घटनेत तीन चार चाकी वाहनांचे नुकसान झाले, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली. एका कारमध्ये एक लहान मूल होते, मात्र कोणतीही इजा न पोहचता ते बचावले. दुपारी सव्वाएकच्या दरम्यान ही घटना घडली. यावेळी रस्त्यावर वर्दळ नसल्याने मोठा अनर्थ टळला. हानी झालेल्या एका कारमध्ये तीन-चार वर्षांचा एक मुलगा मागील सीटवर बसला होता. त्याची आई त्याला कारमध्ये बसवून जवळच छत्री दुऊस्त करण्यासाठी गेली होती. या कारच्या समोरच्या भागावर क्रॉक्रिटचा भाग पडल्याने सुदैवानै सदर मुलगा कोणत्याही हानीविना बचावला. वर्ष-दीड वर्षभरापूर्वी याच इमारतीचा शुक्रवारच्या तुलनेत 20 टक्के भाग असाच कोसळला होता. तेव्हा सुदैवाने एक-दोन वाहनांची हानी सोडल्यास कोणी जखमी झाले नव्हते. शुक्रवारी कोसळलेला काँक्रिटचा भाग मोठा होता. दामबाबाचा आशीर्वाद म्हणून लोक बचावले, कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी चर्चा मडगावात सुरू होती. सदर इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर एक कुरिअरचे कार्यालय आणि एक शिंपी, तर तळमजल्यावर एक चहा पावडरचे दुकान आणि कपडे विक्रेत्याचे एक दुकान कार्यरत आहे. अन्य सर्व आस्थापने बंद आहेत.

इमारत सील करणार : कामत

Advertisement

या घटनेनंतर लगेच स्थानिक आमदार दिगंबर कामत आणि नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि स्थितीचा आढावा घेतला. सदर इमारत सील करण्यात येणार असून तसे आदेश जिल्हाधिकारी देणार असल्याची माहिती आमदार कामत यांनी दिली. सदर इमारतीचा समोरील कमकुवत भाग पाडण्यात येणार आहे. त्यासाठी अग्निशामक दल तसेच एका कंत्राटदाराला साहित्य पुरविण्यास सांगितले असल्याची माहिती कामत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. येथील रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

‘इमारती खासगी, पालिका थेट हस्तक्षेप करू शकत नाही’

अशा प्रकारच्या 15 ते 16 जीर्ण इमारती मडगाव पालिका क्षेत्रात असल्याचा अहवाल पालिकेने सुमारे चार वर्षांपूर्वी तयार केला होता. मात्र यासंदर्भात आवश्यक कारवाई करण्यात पालिका आणि जिल्हा प्रशासन कमी पडत असल्याचे दिसून येत नाही का यासंदर्भात आमदार कामत यांची प्रतिक्रिया जाणली असता यासाठी पालिका आणि आमदार यांना दोष देणे सोपे असल्याचे ते म्हणाले. या इमारती खासगी असल्याने पालिका सरळ हस्तक्षेप करू शकत नाही. कोणी न्यायालयात गेले, तर आम्ही काय करणार, असा उलट सवाल कामत यांनी केला. सध्या भाग कोसळलेल्या इमारतीचा स्थिरता अहवाल घेण्यासाठी फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीनेत कोठावळे, अग्निशामक दलाचे गिल सोझा, बांधकाम खात्याचे अधिकारी तसेच पालिकेचे अधिकारी, नगरसेवक राजू नाईक, माजी नगराध्यक्ष राजेंद्र आजगावकर आदी पाहणीवेळी उपस्थित होते.

सकाळच्या वेळेस भाग कोसळल्यास घडला असता अनर्थ

सदर ठिकाण पहाटे तीन ते सकाळी दहापर्यंत घाऊक फळविक्रेते आणि ग्राहक यांनी भरलेले असते. या वेळेत हा क्राँक्रिटचा मोठा भाग कोसळला असता, तर मोठा अनर्थ घडला असता, अशी प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष आजगावकर यांनी व्यक्त केली. दामबाबाच्या कृपेने सारे बचावले, असे ते म्हणाले.

Advertisement
Tags :

.