Parshuram Ghat सुरक्षित, तरीही 64 घरांना स्थलांतराची नोटीस? काय आहे कारण...
घाट सुरक्षित आहे तर मग 64 घरांना स्थलांतर नोटिसा कशासाठी?
चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात संरक्षक भिंती कोसळत आहेत. नव्याने बांधत असलेल्या गॅबियन वॉललाही भगदाड पडले आहे. मातीचा भराव लोकवस्तीत, शेतीत घुसत आहे. तरीही राष्ट्रीय महामार्ग विभाग म्हणते, परशुराम घाट सुरक्षित आहे. जर घाट सुरक्षित आहे तर मग 64 घरांना स्थलांतर नोटिसा कशासाठी, असा सवाल पेढे, परशुराममधील ग्रामस्थ प्रशासनाला करीत आहेत.
परशुराम घाटाची स्थिती यंदाही धोकादायक झाली आहे. या घाटाच्या पायथ्याला असलेले पेढे आणि माथ्यावरील परशुराम येथील एकूण 64 घरांना दरडी कोसळण्याचा धोका कायम असल्याने या घरांतील नागरिकांनी स्थलांतर करावे, यासाठी स्थानिक प्रशासन दरवर्षी नोटीस बजावत आली आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून अद्याप यासाठी कोणतीही कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात आलेली नाही.
त्यामुळे या घरांवर असलेली भीतीची छाया कायम आहे. गतवर्षी संरक्षक भिंती कोसळल्यानंतर मोठा गाजावाजा करत यावर्षी गॅबियन भिंत बांधण्यात आली. तर परशुरामच्या डोंगरात दरड कोसळू नये म्हणून लोखंडी जाळ्या ठोकण्यात आल्या आहेत.
यावर्षीही पहिल्याच पावसात घाटातील गॅबियन वॉलला भगदाड पडून तेथील मातीचा भराव पेढेतील लोकवस्तीत आणि शेतीत जाऊन घुसला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या दोन्ही गावांमध्ये धोक्याचे सावट कायम राहिले आहे.
ठोस सुरक्षिततेच्या उपाययोजनांसाठी ग्रामपंचायत, देवस्थान यांच्याकडून वेळोवेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पत्रव्यवहाराद्वारे पाठपुरावा करण्यात आला आहे. पेढे व परशुराम या दोन्ही गावांना जोडणारी पारंपरिक पायवाटही या महामार्गाच्या रुंदीकरणात उद्ध्वस्त करण्यात आली. परंतु येथे पूल अथवा पाखाडी बांधण्यात आलेली नाही.
त्यामुळे शाळेतील मुले, शेतकरी यांना येणा-जाण्याचा जवळचा मार्ग बंद झाला आहे. महामार्गावर असणारा परशुराम थांबा येथेही पादचारी पूल उभारण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र ती अद्याप अपूर्ण आहे. सरकार महामार्गावर कोट्यावधी रुपये खर्च करत आहे, मात्र उपाययोजनांसाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत.
केवळ पावसाळा आला की, स्थलांतराच्या नोटिसा बजावल्या जातात. नंतर कोणीही अधिकारी इकडे फिरकतही नाहीत, अशा व्यथा अनेकांनी ‘तरुण भारत संवाद’शी बोलताना व्यक्त केल्या.
नेमके स्थलांतरासाठी जायचे कोठे?
यावर्षी पेढेत 43, परशुराममध्ये 21 अशा 64 पैकी 48 कुटुंबांना स्थलांतर नोटीस दिली गेली, तर 16 जणांनी नोटिसा नाकारल्या. यामध्ये काहींनी स्थलांतर, काही घरे बंद, तर काहींनी सपशेल नाकारताना प्रशासनालाच सवाल केले आहेत. आम्हाला दरवर्षी 6 जूनला नोटीस दिली जात असेल तर आतापर्यंत महामार्ग विभागाला कितीवेळा नोटीस दिलीत? अधिकारी नोटीस देऊन निघून जातात, पण नोटीस घेतलेल्या कुटुंबांनी नेमके स्थलांतरासाठी जायचे कोठे? अशा कोणत्याही प्रश्नांची उत्तरे अधिकाऱ्यांकडे नसल्याचे परशुराम ग्रामपंचायत सदस्य जयदीप जोशी यांनी सांगितले.