बांधकाम ढासळत असल्याने Parshuram Ghat तील गॅबियन वॉलचे काम थांबवले
पावसाळ्यानंतर पुन्हा नव्याने उभारणी करणार, ‘राष्ट्रीय महामार्गा’चा निर्णय
चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणांतर्गत परशुराम घाटातील धोकादायक दरडींच्या सुरक्षिततेच्या उपायोजनांच्या दृष्टीने गॅबियन वॉल उभारणी सुरू होती. मात्र सुरू असलेल्या पावसात ती ढासळू लागल्याने तूर्तास वॉलचे बांधकाम थांबवण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग विभागाने घेतला आहे. आता पावसाळ्यानंतर ढासळत असलेला भाग काढून पुन्हा नव्याने उभारणी केली जाणार आहे.
गेल्या तीन-चार वर्षांपासून परशुराम घाट पावसाळ्यात कायम चर्चेत राहिला आहे. या घाटात एका बाजूला उंच दरडीचा भाग असल्याने येथे पावसाळ्यात नियमित घडणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना हाती घेण्यात आल्या. यावर्षी धोकादायक दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळी बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तर दुसरीकडे गतवर्षीच्या पावसात कोसळलेल्या संरक्षण भिंतीच्या बाजूने गॅबियन वॉल उभारण्याचे कामही वेगाने सुरू आहे.
गेले काही दिवस कोसळत असलेल्या पावसात मंगळवारी गॅबियन वॉल घसरत असल्याचे समोर आल्याने या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दरम्यान, गॅबियन वॉल उभारणी हा घाटातील सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजनांपैकी शेवटचा पर्याय आहे. त्यामुळे महामार्ग विभागाच्या दृष्टीनेही हा पर्याय यशस्वी ठरण्यापूर्वीच पावसाने घात केला.
यापूर्वी घाटात विसावा पॉईंटजवळ भली मोठी गॅबियन वॉल बांधण्यात आली असून ती आजतागायत सुस्थितीत आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या गॅबियन वॉलचे काम अर्धवट आहे. ते पूर्ण झाले असते तर हे घडले नसते, असा निष्कर्ष महामार्गचे अधिकारी काढत आहेत. बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच आणि नियोजित वेळेपेक्षा अगोदरच पावसाने सुरुवात केल्याने अर्धवट स्थितीत असलेल्या या वॉलचे काम ढासळू लागले.
या ठिकाणी डोंगरातून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह असल्याने त्याचा फटका अर्धवट अवस्थेत असलेल्या या गॅबियन वॉलला बसला. सुरू झालेला पाऊस आणि ढासळत असलेले बांधकाम लक्षात घेऊन तूर्तास सुरू असलेले काम थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या ढासळत असलेल्या भागावर मेमरीन शीट टाकण्यात आली आहे. पावसाळा संपल्यानंतर घसरलेल्या गॅबियन वॉलचा 40 ते 45 मीटरचा हा भाग पुन्हा नव्याने बांधण्यात येणार असल्याचे महामार्गच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.