युरोपमध्ये फैलावतोय पॅरेट फीव्हर
जीवघेणा आजार : आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ बर्लिन
युरोपच्या अनेक देशांमध्ये एक जीवघेणा आजार फैलावत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराला पॅरेट फीव्हर नाव दिले आहे. हा आजार अत्यंत धोकादायक असून आतापर्यंत यामुळे 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.
युएस सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार पॅरेट फिव्हर पक्ष्यांमध्ये आढळून येणाऱ्या एका बॅक्टेरियामुळे फैलावत आहे. या बॅक्टेरियाने संक्रमित पक्ष्याने एखाद्या माणसाचा चावा घेतल्यास तो देखील संक्रमित होतो. हा आजार संक्रमित प्राण्यांचे मांस सेवन केल्याने फैलावत नाही.
पॅरेट फिव्ह्रला सिटाकोसिस नावाने देखील ओळखले जाते. या आजारामुळे युरोपीय देशांमध्ये अनेक लोक प्रभावित झाले आहेत. ऑस्ट्रियामध्ये 2023 मध्ये 14 रुग्णांची पुष्टी झाली होती. परंतु चालू वर्षात आतापर्यंत 4 रुग्ण आढळून आले आहेत. तर डेन्मार्कमध्ये 27 फेब्रुवारीपर्यंत 23 रुग्णांची पुष्टी झाली होती.
जर्मनीत मागील वर्षी 14 रुग्ण सापडले होते. तर चालू वर्षात आतापर्यंत 5 रुग्णांची नोंद झाली आहे. नेदरलँडमध्ये देखील 21 रुग्ण आढळून आले आहेत. अलिकडच्या काळात आढळून आलेले बहुतांश रुग्ण हे पाळीव किंवा जंगली पक्ष्यांच्या संपर्कात आल्याने आजारी पडले असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.
हवामान बदलही कारण
हवामान बदलामुळे अनेक आजार फैलावत आहेत. सखल आणि उष्ण ठिकाणी राहणारे प्राणी वाढते तापमान सहन करू शकत नसल्याने ते उंच किंवा थंड ठिकाणांच्या दिशेने स्थलांतर करत आहेत. या प्राण्यांसोबत त्यांचे आजारही या ठिकाणी पोहोचत आहेत. जंगलतोड झाल्याने प्राणी, मच्छर, बॅक्टेरिया, फंगसशी माणसांचा संपर्क वाढला आहे. दुसरीकडे हे सर्व जीवजंतू स्वत:ला बदलत्या हवामानानुसार अनुकूल करून घेत आहेत.