लंकन संघात पेरीस नवा चेहरा
वृत्तसंस्था / गॅले
सध्या यजमान लंका आणि न्यूझीलंड यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या कसोटीसाठी लंकन संघात फिरकी गोलंदाज निशान पेरीस या नव्या चेहऱ्याला देण्यात आली आहे. लंकन संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज विश्वा फर्नांडो दुखापतीमुळे उपलब्ध होणार नाही.
लंकन संघातील वेगवान गोलंदाज 33 वर्षीय विश्वा फर्नांडोला स्नायु दुखापत झाली असून तो दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध होवू शकणार नाही, अशी माहिती लंकन क्रिकेट मंडळाने दिली आहे. अलिकडेच झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी त्याला अंतिम 11 खेळाडूंत स्थान मिळाले नव्हते. लंकेने ही पहिली कसोटी 63 धावांनी जिंकून या मालिकेत 1-0 अशी आघाडी न्यूझीलंडवर घेतली आहे. 2018 साली तसेच चालु वर्षाच्या प्रारंभी लंकन संघामध्ये फिरकी गोलंदाज निशान पेरीसचा दोनवेळा समावेश करण्यात आला होता. पण त्याला अंतिम 11 खेळाडूंत स्थान मिळू शकले नाही. सध्या लंकन संघातील गोलंदाज रमेश मेंडीस सूर मिळविण्यासाठी झगडत असल्याने त्याच्या जागी पेरीसला संधी मिळेल, असा अंदाज आहे.
निशान पेरीसने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत 41 प्रथम श्रेणी सामन्यात 24.37 धावांच्या सरासरीने 172 गडी बाद केले आहेत. लंका अ आणि द. आफ्रिका अ यांच्यात झालेल्या पहिल्या अनाधिकृत कसोटी सामन्यात पेरीसने 3 गडी बाद केले होते. लंका आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप अंतर्गत होत आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून लंकन संघाने या स्पर्धेच्या गुणतक्त्यात तिसरे स्थान मिळविले आहे. भारतीय संघाने बांगलादेश विरुद्ध पहिली कसोटी जिंकून आपले अग्रस्थान अधिक भक्कम केले आहे.