For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पर्रीकर गटाची प्रचारात आघाडी

02:47 PM Mar 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
पर्रीकर गटाची प्रचारात आघाडी
Advertisement

घरोघरी भेटी देण्यावर अधिक भर : अनेक प्रभागात पहिली फेरी पूर्ण

Advertisement

पणजी : पणजी महापालिकेसाठी येत्या दि. 11 मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीत मंत्री बाबुश मोन्सेरात व उत्पल पर्रीकर या दोन्ही गटांमध्ये होणाऱ्या थेट लढतीच्या पार्श्वभूमीवर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील ‘आमी पणजेकार’ गटाने प्रचारात आघाडी घेतली आहे. घरोघरी भेटी हा त्यांचा प्रमुख अजेंडा असून रायबंदर येथून प्रचाराची सुऊवात करताना त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. मनपा निवडणुकीत ‘आमी पणजेकार’ गटातर्फे घरोघरी मतदारांच्या भेटीत आतापर्यंत त्यांनी रायबंदर प्रभागात जवळजवळ सर्व घरांना भेटी दिल्या आहेत. त्याचबरोबर मळा भागात 50 टक्के घरांना भेटी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे पणजी भागातही लोकांच्या गाठीभेटी घेण्यास प्रारंभ केला आहे, अशी माहिती पर्रीकर यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

केवळ पुत्राला महापौरपदी ठेवले

Advertisement

या भेटीदरम्यान लोकांनी ज्या तक्रारी, समस्या कथन केल्या, त्या ऐकल्यानंतर मन सुन्न झाले. यावरून विद्यमान पालिका मंडळाने गेल्या पाच वर्षांमध्ये एक तर लोकहिताचे कोणतेही काम केलेले नाही किंवा ती कामे योग्य पद्धतीने झाली नसल्याचे स्पष्ट होत आहे. केवळ स्वपूत्राला महापौरपदी कायम ठेवण्याव्यतिरिक्त  मंत्री मेन्सेरात यांनी आणखी काहीच केले नाही. पणजी केवळ मोन्सेरात कुटुंबाच्या दावणीला बांधली आहे, असे वाटते,  असे पर्रीकर म्हणाले.

पणजी बनली कॅसिनो कॅपिटल

पणजी शहरातील ‘स्मार्ट’ कामांचे दाखले देऊन महापौर स्वत:चीच पाठ थोपटून घेत असले तरी या मंडळाने काही वर्षांपूवर्वी स्वच्छ, सुंदर, नीटनेटकी असलेल्या पणजी ‘राजधानी’चे ‘कॅसिनो’ कॅपिटल बनविले आहे. कॅसिनोमुळे उद्भवणाऱ्या अनेक समस्यांना पणजीकरांसह पणजीत येणाऱ्या गोमंतकीयांना सामोरे जावे लागत आहे. सायंकाळच्या वेळीस मांडवीतून असह्या दुर्गंधी येत असते. सायंकाळी चार वाजल्यापासून पहाटेपर्यंत त्या परिसरात बेशिस्त वाहतूक व पार्किंग सुरु असते.

पणजीला ‘स्मार्ट’ ऐवजी ‘स्पा सिटी’

एवढेच नव्हे, तर पणजी ‘स्मार्ट’ सिटीच्या ऐवजी ‘स्पा’ सिटी बनवून टाकले आहे. पणजीत कितीतरीच स्पा चालतात, त्यावर कोणाचेच नियंत्रण नाही, असे आरोप पर्रीकर यांनी केले.

वाहतूक, पार्किंग समस्या गंभीर 

पणजीतील समस्या संपलेल्या नाहीत. पार्किंगचा प्रश्न आजही ‘जैसे थे’च आहे. राजधानीत खरे तर भाडोत्री वाहनांना प्रवेश बंदी केली पाहिजे. त्याचबरोबर कॅसिनोंसाठी ग्राहक आणणाऱ्या वाहनांना ‘नो ड्रॉप झोन’, ‘नो स्टॉप झोन’,अंतर्गत शहराबाहेरच प्रवाशांना उतरविण्यास लावून त्या प्रवाशांना बसमधून कॅसिनोंपर्यंत नेण्याची व्यवस्था कॅसिनो कंपन्यांनी स्वत: करावी, असे बंधन घातले पाहिजे, असे पर्रीकर यांनी सांगितले.

रायबंदर जेटी नेमकी कोणासाठी?

सर्वच प्रभागांमध्येही जवळजवळ अशीच स्थिती आहे. रायबंदर येथे बांधण्यात आलेल्या जेटीला पुरेशा पायऱ्या नाहीत. त्यावरून सदर जेटी मच्छीमारांसाठी आहे की, अन्य कोणत्या व्यावसायिक कामासाठी बांधण्यात आली आहे, अशी शंका स्थानिक लोक उपस्थित करत आहेत. त्याचबरोबर याच प्रभागात मैदानासाठी संपादित केलेल्या जागेच्या शेजारी टीसीपीच्या 39अ नुसार बदल केले जाण्याची भीतीही लोक वर्तवत आहेत, असे पर्रीकर यांनी सांगितले.

उत्पल पर्रीकर यांच्या प्रचारातील मुद्दे...

  • पणजी बांधलीय मेन्सेरात कुटुंबाच्या दावणीला
  • पाच वर्षांत केवळ स्वपुत्राला महापौरपदी ठेवले
  • स्वच्छ, सुंदर पणजी बनलीय ‘कॅसिनो कॅपिटल’
  • ‘स्मार्ट’ ऐवजी ‘स्पा सिटी’ म्हणजे विकास काय?
  • रायबंदर जेटीच्या वापरासंदर्भात संशयास जागा
  • सर्वच रस्त्यांवर वाहतूक, पार्किंगची समस्या गंभीर
Advertisement
Tags :

.