महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निसर्गाचं पार्लर....2

06:30 AM Oct 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लहानपणी गोष्ट वाचली होती निळ्या कोह्याची. जो चुकून रंगाऱ्याच्या हौदात पडतो आणि त्याचं सगळं अंग निळं होतं. त्याच्या त्या रंग बदलामुळे जंगलातल्या प्राण्यांना नवीनच कोणीतरी प्राणी आलाय असं वाटतं. त्याचा तो रंग, चालण्याचा डौल बघून त्याला चक्क जंगलाचा राजासुद्धा करतात. पण नेमकं राजा केल्यानंतर दरबारातल्या काही गमतीजमती पाहून कोल्हा आपल्या स्टाईलमध्ये मोठ्या मोठ्याने गळे काढून ओरडायला लागतो आणि त्याचं पितळ उघडं पडतं. पण या सगळ्या  प्रकारात प्राण्यांना रंग बदलता येतात किंवा लावता येतात हे कळल्यानंतर एक छोटंसं कबूतर राखाडी रंगाचं असा कुठे रंग आपल्यालाही मिळतो का? म्हणून बघायला निघाला. बघता बघता जंगल सगळं पार केलं, डोंगर ओलांडले आणि एका गावापाशी आला. तिथे आल्यावर त्याला खूप गर्दी दिसली. बरेच लोक इकडून तिकडे धावपळ करत होते. रस्त्याने गाड्या चाललेल्या होत्या आणि पलीकडेच त्याला त्या ठिकाणी सनई चौघड्याचे आवाज येऊ लागले. ते आवाज ऐकल्यानंतर तिथल्या जवळच्या झाडावर जाऊन काय चाललंय ते बघावं म्हणून जाऊन बसला. दारात मांडव सजलेला होता. घराला तोरण बांधलेले होते आणि लोकांची लगबग चालू होती. मधोमध दोन पाट मांडलेले होते, कडेला एका मोठ्या घंगाळ्यामध्ये पिवळ्या रंगाचे पाणी केलेले तर दुसरीकडे परातीमध्ये हळद कालवून ठेवलेली. तिथे हळदीचा कार्यक्रम असावा, असे एकूण त्या चित्रावरून वाटत होतं. या पक्षाच्या काय मनात आलं कुणास ठाऊक तो पटकन उडाला आणि त्या घंगाळ्यातल्या पाण्यात आपले पंख फडफडत डुंबला, दोनदा तीनदा असं केल्यानंतर त्याच्या पंखांना तो पिवळा रंग लागला. तिथनं उडी मारतांना त्या परातीमध्ये काय आहे हे बघण्यासाठी पुन्हा तो परातीत येऊन लोळू लागला. आता त्याच्या अंगावरती सगळा रंग घट्ट बसला होता. नंतर तो वर झाडावरती आला. पंख पसरले आणि वाऱ्यावरती उडू लागला. सुंदर हळदीचा वास त्याच्या अगदी नाकात शिरला होता. आता रंग वाळून छान पिवळा घट्ट झाला. परत घराकडे यायला लागला. घरी आल्यानंतर मात्र घरट्यामध्ये त्याला कोणी घेईना, तू आमच्या ओळखीचा नाहीस, तू आमच्या जाती धर्माचा नाहीस, तू आमच्या रंगाचा तर नाहीच नाहीस, असं म्हणून त्याला तिथून हाकलून लावलं. आता मात्र पक्षी फार दुखी झाला. उडत उडत तो एका देवळाच्या इथे आला. त्या देवळामध्ये अनेक जोडपी लग्न करून आल्यानंतर देवाच्या नावानं भंडारा उधळत होती. तो भंडारा देखील पिवळ्याच रंगाचा असल्यामुळे पुन्हा पक्षाच्या अंगावर हा पिवळा रंगाचा  तिसरा थर बसला. आणि मग मात्र पक्षाने बाकीचा सगळा विचार सोडून देऊन आनंदाने इकडून तिकडे उडायला सुरुवात केली. तिथेच काही लहान मुलं खाली खेळत होती. ते या पक्षाकडे बोट दाखवून म्हणत होती तो बघा हळद्या, तो बघा हळद्या आणि मग त्या दिवसापासून या पक्षाचं नाव हळद्या असं नक्की झालं.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article