संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 28पासून सुरू होण्याची शक्यता
निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प मांडणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थसंकल्प रविवार, 1 फेब्रुवारी रोजी सादर होण्याची अपेक्षा आहे. संसदीय कामकाजावरील मंत्रिमंडळ समितीने हे तात्पुरते वेळापत्रक तयार केले आहे. त्यानुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 28 जानेवारी रोजी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील, असे संसद भवनातील अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले.
राष्ट्रपतींचे अभिभाषण पारंपरिकपणे वर्षाच्या पहिल्या संसदीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी होते. त्यानुसार 28 रोजी राष्ट्रपती संयुक्त सभागृहाला संबोधित करतील. त्यानंतर 29 जानेवारी रोजी बीटिंग रिट्रीट समारंभ होणार असल्याने त्या दिवशी उभय सभागृहांची बैठक होणार नाही. पुढे, 30 जानेवारी रोजी आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाऊ शकते. त्यापाठोपाठ 31 जानेवारी रोजी लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज होणार नाही. मात्र, केंद्रीय अर्थसंकल्प रविवार असूनही नियमाप्रमाणे 1 फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार आहे.
13 फेब्रुवारीपासून एक महिन्याची सुट्टी
राष्ट्रपतींचे अभिभाषण आणि केंद्रीय अर्थसंकल्पावरील आभार प्रस्तावावरील चर्चेनंतर संसद 13 फेब्रुवारीपासून सुमारे एक महिन्याच्या सुट्टीच्या कालावधीसाठी तहकूब केले जाईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनातील सुट्टीमुळे संबंधित स्थायी समित्यांना विविध केंद्रीय मंत्रालये आणि विभागांच्या अनुदानांच्या मागण्या तपासण्यासाठी वेळ मिळतो. त्यानंतर संसदेचे दुसऱ्या सत्रातील कामकाज 9 मार्च रोजी पुन्हा सुरू होऊन गुरुवार, 2 एप्रिलपर्यंत चालणार असल्याचे समजते. संसद अधिवेशन शक्यतो शुक्रवारी तहकूब केली जाते, परंतु 3 एप्रिल रोजी गुड फ्रायडे असल्यामुळे गुरुवारीच कामकाजाचा समारोप केला जाईल.