For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

CJP Protest |‘सीजेपी’चा संसदेवर मोर्चा मोठ्या संख्येने सहभागाचे अभिजीत दीपके यांचे आवाहन

08:40 PM Jul 19, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
cjp protest  ‘सीजेपी’चा संसदेवर मोर्चा मोठ्या संख्येने सहभागाचे अभिजीत दीपके यांचे आवाहन
Advertisement

► वृत्तसंस्था नवी दिल्ली
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला 20 जुलै रोजी एक महिना पूर्ण होत असताना सोमवारी संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे.

Advertisement

या मोर्चापूर्वी, कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत दिल्ली पोलिसांनी जंतर मंतर येथून रुग्णालयात दाखल केले आहे. आता अभिजीत दीपके पूर्णपणे या मोर्चाचे नेतृत्व करत आहेत.

दिल्लीत सीजेपी संस्थापक अभिजीत दीपके यांनी शनिवारी उपोषणाची घोषणा केली. अवघ्या दोन दिवसांत त्यांची प्रकृती खालावली आहे. रविवारी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी सोनम वांगचुक यांच्यासह उपोषणावर असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सलाम केला.

Advertisement

अभिजीत दीपके यांनी सर्वांना 20 जुलैच्या संसदेवरील मोर्चात सामील होण्याचे आवाहन केले. दरम्यान, सोनम वांगचुक हे देखील रुग्णालयात उपोषण करत आहेत. त्यांच्या पत्नी, डॉ. गीतांजली आंगमो, सोनम वांगचुक यांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवत आहेत.

सोनम वांगचुक यांचा जनतेला संदेश
डॉ. गीतांजली आंगमो यांनी सोनम वांगचुक यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक संदेश लिहिला आहे. ‘दुसरे स्वातंत्र्य आंदोलन 20 जुलै रोजी होणार आहे’ असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. या आंदोलनाची संकल्पना ‘भयमुक्त भारत, अन्यायमुक्त भारत’ अशी असेल.

भयमुक्त भारत म्हणजे बेकायदेशीर अटकेच्या भीतीपासून मुक्ती आणि अन्यायापासून मुक्ती म्हणजे पेपरफुटीसारख्या अन्यायांपासून मुक्ती असे त्यांनी स्पष्ट केले.

सोनम वांगचुक यांनी भारताच्या दुसऱ्या स्वातंत्र्यासाठीच्या या आंदोलनात सामील होऊन ते यशस्वी करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. तसेच त्यांनी सफदरजंग येथील आपल्या स्थानबद्धतेला बेकायदेशीर अटक म्हटले आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर मंतर येथे सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पक्षाच्या (सीजेपी) आंदोलनाने एक नवीन वळण घेतले आहे.

या आंदोलनातील प्रमुख व्यक्ती सोनम वांगचुक प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल झाल्याने हे आंदोलन इथेच संपेल की नव्या स्वरूपात सुरू राहील याबाबत साशंकताही व्यक्त केली जात आहे. दरम्यान, सीजेपी नेते अभिजित दीपके यांनी 20 जुलै रोजी मोर्चा आणि उपोषणाची घोषणा केली आहे. सोनम वांगचुक यांना जंतर मंतरवरून हटवून रुग्णालयात दाखल केल्यानंतर आंदोलनाच्या दिशेबाबत चर्चा तीव्र झाली आहे.

तथापि, आंदोलन लगेचच संपणार नसल्याचे सीजेपीने जाहीर केले आहे. 20 जुलै रोजी नियोजित मोर्चा आणि उपोषणाच्या माध्यमातून सरकारवर दबाव कायम ठेवला जाईल. मात्र, वांगचुक यांच्या अनुपस्थितीतही आंदोलनाला कितपत गती मिळेल, हे येत्या काही दिवसांतच समजणार आहे.

Advertisement
Tags :

.