वाहन खरेदीसाठी पार्कीग सक्तीच्या हालचाली
कोल्हापूर :
शहरामध्ये चारचाकी, दुचाकींची संख्या वाढली आहे. बेशिस्त पार्कींगमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. यामुळे नवीन गाडी घेणाऱ्यांना पार्कींगची सुविधा बंधनकारक करण्यासंदर्भात शासकीय पातळीवर पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत.
कोल्हापूरमध्ये चारचाकी, दुचाकी खरेदीची क्रेझ आहे. वाहनांचे नवीन मॅडेल आल्यानंतर ते कोल्हापुरात खरेदी हमखास खरेदी केले जाते. 2023-24 या आर्थिक वर्षात तब्बल 60 हजार वाहनांची विक्री झाली आहे. शहरात एका घरामागे एक चारचाकी आणि प्रत्येक माणसामागे दुचाकी अशी अवस्था झाली आहे. वाहनांची संख्या जास्त आणि रस्त्यांची रूंदी मात्र तेवढीच आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी रिकामे असणारे रस्त्यावर आता वाहतुक कोंडी होत आहे. पार्कींगची सोय नसल्याने दिसेल तेथे रस्त्याच्या दोन्हीबाजूला वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतुक पूर्ण पॅक होत आहेत. जिथे दोन वाहने आरामात जात होती. त्या मार्गावर आता एक वाहन नेणे कठीण होऊन बसले आहे.
राज्यात मेट्रो सिटीसह अन्य प्रमुख शहरांत वाहनांची संख्या वाढू लागली आहे. जर वाहन खरेदीवेळीच पार्कींगची सक्ती करण्याचा निर्णयाची अंमलबजावणी झाली तर वाहन खरेदी करणाऱ्या व्यक्तीला गाडी पार्क करण्यासाठी पुरेशी जागा आहे याचे सर्टिफिकेट द्यावे लागेल. हे सर्टिफिकेट पोलिस प्रशासन अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेकडून घ्यावे लागेल, असा प्राथमिक अंदाज आहे.
- अंमलबजावणी की नुसतीच चर्चा
राज्यात पार्किंगची सोय असेल तरच वाहन खरेदी करता येणार अशी अट बंधनकारक करण्यात येणार असल्याची चर्चा यापूर्वीही सुरु झाली होती. परंतू, हा प्रस्ताव कालांतराने बारगळला होता. आता पुन्हा याची शासकीय पातळीवर चर्चा सुरु झाल्याचे समजते. याची अंमलबजावणी होणार की पुन्हा नुसतीच चर्चा ठरणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.