गडगडाटासह बरसला पर्जन्यराज
आज, उद्याही पावसाची शक्यता : हवामान खात्याचा यलो अलर्ट
पणजी : हवामान खात्याने केलेल्या अंदाजानुसार गोव्यात काल गुऊवारी सायंकाळी सर्वत्र मध्यम तथा हलक्या स्वरूपात पाऊस पडला. अनेक ठिकाणी जोरदार वादळी वारे वाहू लागले होते. आजही गोव्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवून हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने आठ दिवसांपूर्वी वर्तविलेल्या अंदाजानुसार काल गुऊवारी राज्यात सर्वत्र मध्यम तथा हलक्या स्वरूपात पाऊस पडला. माशेल, बाणस्तारी, कुंभारजुवे, जुने गोवे, रायबंदर आदी भागात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गडगडाटासह जोरदार पाऊस पडला. त्यानंतर पणजीत अवघ्या काही वेळेसाठी जोरदार पाऊस पडून गेला. मडगाव, पेडणे, म्हापसा, फोंडा आदी भागात जोरदार पाऊस पडल्याचे वृत्त आहे. साखळी येथे रात्री साडेनऊच्या दरम्यान वादळी वारे आणि गडगडाटासह मुसळधार पाऊस पडल्याचे वृत्त आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील तापमान बरेच वाढत गेले आणि मंगळवारपासून गोव्यात ढगाळ वातावरणाला प्रारंभ झाला. बुधवारी सायंकाळी गोव्यात सर्वत्र ढगाळ वातावरण होते. त्यामुळे तापमान बरेच वाढले होते. गुऊवारी असह्य उकाडा सुरू झाला आणि त्यानंतर सायंकाळी सर्वत्र पाऊस पडला आणि नागरिकांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला.